जंगली मशरूम तोडण्याच्या कारणावरून यवतमाळ जिल्ह्यात युवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 21:18 IST2020-09-11T21:16:57+5:302020-09-11T21:18:38+5:30
जंगलातील मशरूम तोडण्याच्या कारणावरून उमरखेड तालुक्यातील कोरटा येथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातीलच युवकाला बेदम मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वन विभागाच्या कोरटा येथील कार्यालयाला घेराव घातला.

जंगली मशरूम तोडण्याच्या कारणावरून यवतमाळ जिल्ह्यात युवकाला मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जंगलातील मशरूम तोडण्याच्या कारणावरून उमरखेड तालुक्यातील कोरटा येथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातीलच युवकाला बेदम मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वन विभागाच्या कोरटा येथील कार्यालयाला घेराव घातला. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी जंगलाकडे पळ काढला.
कोरटा येथील विशाल ब्रह्मटेके शुक्रवारी दुपारी सहकाऱ्यांसह जंगलामध्ये जंगली मशरूम आणण्याकरिता गेला होता. तो परत येत असताना वन कर्मचाऱ्यांनी त्याच्या हातातील जंगली मशरूम हिसकावून त्याला बेदम मारहाण केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी कोरटा येथील वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा नेला. हे कार्यालय पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयाअंतर्गत येत असून उमरखेड तालुक्याच्या बंदी भागात आहे.
या घटनेमुळे कोरटा येथे तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळावर दराटी येथील पोलीस हजर झाले आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी उशिरापर्यंत पोहोचले नव्हते. विशाल ब्रह्मटेके याला मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याला जोपर्यंत आणले जात नाही, तोपर्यंत तेथून परत जाणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. तेथील वनाधिकारी विनायक खैरनार हे नुकतेच रुजू झाले असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.