आनंदनगरच्या युवकाची आत्महत्या नसून हत्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST2020-02-06T06:00:00+5:302020-02-06T06:00:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क महागाव /हिवरा : तालुक्यातील आनंदनगर येथे पूस नदी किनारी मंगळवारी झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत कबीर नारायण ...

आनंदनगरच्या युवकाची आत्महत्या नसून हत्याच
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव /हिवरा : तालुक्यातील आनंदनगर येथे पूस नदी किनारी मंगळवारी झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत कबीर नारायण पवार या २२ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. मात्र ही आत्महत्या नसून त्याची हत्या केल्याचा आरोप त्याच्या आई-वडिलांनी केला आहे.
आनंदनगर येथील कबीर नारायण पवार याचा मृतदेह पूस नदी किनारी एका झाडाच्या खालच्या भागात साडीने फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. मात्र कबीरने स्वत:हून फाशी घेतलेली नसून त्याचा आधी खून करण्यात आला असावा आणि नंतर साडीच्या सहाय्याने गळफास देऊन आत्महत्येचा देखावा निर्माण केल्याचा संशय त्याच्या आईने व्यक्त केला. कबीरच्या मृत्यूचे मूळ हिवरा येथे दडले असावे, असाही संशय गावकरी व्यक्त करीत आहे. कबीरच्या कुटुंबात लहान भाऊ, आई, वडील आहेत. कुटुंबात कोणतेही वाद नाहीत. कबीर धनोडा येथे एका हॉटेलवर काम करीत होता. त्याच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे आनंदनगर येथे फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून येण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी टेंभी, कासारबेळ या परिसरातही फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहे. त्या प्रकरणाचा तपास अद्याप रखडला आहे. कबीरची आत्महत्या नसून त्याचा खूनच असल्याचा संशय त्याची आई, वडील व राष्टÑीय बंजारा परिषदेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केला. त्यासाठी बुधवारी कबीरचे नातेवाईक व गावकरी ठाण्यावर धडकले होते.