गारपीटग्रस्तांच्या मदतीला धावले तरुण
By Admin | Updated: March 3, 2016 02:39 IST2016-03-03T02:39:34+5:302016-03-03T02:39:34+5:30
सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या गारपिटीत शेतात काम करणारे शेकडो मजूर अडकले होते. या मजुरांच्या मदतीसाठी झाडगावचे तरुण धावून गेले.

गारपीटग्रस्तांच्या मदतीला धावले तरुण
झाडगावच्या तरुणांचे रात्रभर मदतकार्य : शेकडो शेतमजुरांना सुरक्षितस्थळी हलविले
अविनाश खंदारे उमरखेड
सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या गारपिटीत शेतात काम करणारे शेकडो मजूर अडकले होते. या मजुरांच्या मदतीसाठी झाडगावचे तरुण धावून गेले. त्यांना सुरक्षितस्थळी हलविलेच नाही, तर रस्त्यावर पडलेले वृक्षही या तरुणांनी बाजूला केले. रात्रभर केलेली ही मदत अनेकांसाठी जीवनदायी ठरली.
उमरखेड तालुक्यात २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी वादळी पावसासह गारपिटीला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. त्यातच विजांचा कडकडाट होत होता. अशा परिस्थितीत शेतात आणि घरात अडकलेल्यांना सुरक्षित कोण काढणार, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र झाडगाव येथील पोलीस पाटील स्वप्नील पाटील यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. गावातील पवन गिरी, प्रवीण गिरी, राहुल गिरी, राजेश सूर्यवंशी, बालाजी कुबडे, मनोज गिरी, बालाजी गिरी, मनोज मुरके, विनोद गिरी यांनी वादळाची तमा न बाळगता गारपिटीत अडकलेल्यांना मदतीचे कार्य सुरू केले. रस्त्यावर वृक्ष पडल्याने वाहनांमध्ये अनेकजण अडकले होते. त्यात वृद्ध आणि लहान मुलेही होती. तसेच परिसरातील शेतातही मजूर अडकलेले होते. या मजुरांना सुरक्षितस्थळी आणून या सर्वांनी मोलाची मदत केली.
उमरखेड-ढाणकी मार्गावर केवळ २५९ लोकसंख्या असलेल्या या गावातील तरुणांनी धाडस दाखवून अनेकांना संकटात मदत केली. पोलीस, महसूल आणि आरोग्य प्रशासनालाही त्यांनी सहकार्य केले. गाव छोटे असले तरी मनाने मोठे आहे, याचाच प्रत्यय या तरुणांनी आणून दिला.