यवतमाळात वायपीएलचा थरार
By Admin | Updated: November 8, 2014 01:50 IST2014-11-08T01:50:19+5:302014-11-08T01:50:19+5:30
क्रिकेटचा जुनून... उत्तुंग षटकार, रोहमर्षक, थरारक सामना आपण टीव्हीवर नेहमीच अनुभवतो. आता तोच जोश, तोच थरार यवतमाळच्या प्रेक्षकांना ९ नोव्हेंबरपासून ..

यवतमाळात वायपीएलचा थरार
नीलेश भगत यवतमाळ
क्रिकेटचा जुनून... उत्तुंग षटकार, रोहमर्षक, थरारक सामना आपण टीव्हीवर नेहमीच अनुभवतो. आता तोच जोश, तोच थरार यवतमाळच्या प्रेक्षकांना ९ नोव्हेंबरपासून पोस्टल ग्राऊंडवर सुरू होणाऱ्या यवतमाळ प्रिमिअर लिग-२०१४ च्या निमित्ताने प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त यवतमाळ पब्लिक स्कूलने (वायपीएस) शालेय विद्यार्थ्यांच्या क्रिकेटला प्रोत्साहन व चालना देण्यासाठी ‘यवतमाळ प्रिमिअर लिग-२०१४’चे दिमाखदार आयोजन केले आहे. १७ वर्षाआतील मुलांसाठी असलेल्या या स्पर्धेत १२ शाळेतील निवडक संघ २१ हजार रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी जिंकण्यासाठी एकमेकांशी झुंजणार आहेत.
देशाच्या गल्लीबोळात, ग्रामीण व शहरी भागात सारख्याच जुनुनने खेळल्या जाणारा एकमेव खेळ म्हणजे क्रिकेट. यवतमाळात शालेयस्तरावरील विद्यार्थ्यांना या खेळाचे अक्षरश: वेड आहे. मात्र दुर्दैवाने यांना निकोप स्पर्धेचे वातावरण नाही. तसेच व्यासपीठही मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन वायपीएसने होतकरू खेळाडूंना चालना देण्यासाठी या लिग स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेवर चार लाख रुपयांच्यावर आयोजनाचा खर्च असून शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर अशा प्रकारचे प्रथमच भव्य आयोजन होत आहे.
पोस्टल ग्राऊंडवर या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असून मातीच्या दोन विकेट तयार करण्यात आल्या आहेत. या निमित्ताने शालेय विद्यार्थी प्रथमच टर्फ विकेटवर खेळण्याचा आनंद लुटणार आहेत. ९ ते २३ नोव्हेंबरपर्यंत आयोजित या स्पर्धेसाठी ए, बी व सी असे चार-चार संघाचे तीन ग्रुप तयार करण्यात आले आहे. ए, बी, सी या तीन ग्रुपमधील संघात १७ नोव्हेंबरपर्यंत लिग पद्धतीने सामने होतील. यात प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे. त्यानंतर प्रत्येक गटात गुणानुक्रमे पहिले दोन संघ ‘सुपर सिक्स राऊंड’मध्ये प्रवेश करतील. सुपर सिक्स संघाचे सामने १८ ते २१ नोव्हेंबरपर्यंत आयोजित होतील.
सुपर सिक्स गटातून नेट रनरेटच्या आधारावर प्रथम तीन संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतील. २२ नोव्हेंबरला दोन सेमीफायनल रंगणार असून पहिला सेमीफायनल सुपर सिक्स गटातील प्रथम दोन संघादरम्यान होईल. यात विजयी होणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार तर पराभूत संघ सुपर सिक्स गटातील तिसऱ्या क्रमांकाच्या संघाबरोबर दुसरा सेमीफायनल खेळणार आहे.
अंतिम सामना २३ नोव्हेंबरला होईल. प्रत्येक सामन्यात धावते समालोचन असल्याने प्रेक्षकांना अधिक आनंद लुटता येणार आहे. प्रत्येक सामन्यातील मॅन आॅफ द मॅचला आयोजकांच्यावतीने ५०० रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी वणी तालुक्यातील स्वर्णलिला इंग्लिश स्कूल व लॉयन इंग्लिश स्कूल असे दोन बाहेरगावचे संघ असून आयोजकांनी त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था केली आहे.
शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या क्रिकेटला चालना देण्यासाठी प्रथमच आयोजित ‘यवतमाळ प्रिमिअर लिग’ स्पर्धेत उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शाळा, महाविद्यालय, क्रीडा प्रेमी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.
रविवारी स्पर्धेचे उद्घाटन
वायपीएल स्पर्धेचे उद्घाटन रविवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावना गवळी, यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी उद्घाटनासोबतच विद्यार्थ्यांचा लाँग मार्च आणि रंगारंग कार्यक्रम होणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर लगेच क्रिकेट सामन्यांना प्रारंभ होणार आहे. उद्घाटनीय सामना जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल विरुद्ध सेंट अलायसेस इंग्लिश स्कूल यांच्यात रंगणार आहे.
स्पर्धेतील १२ संघ
ग्रुप ए
स्टेंट अलॉयसेस इंग्लिश स्कूल
जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल
अँग्लो हिंदी हायस्कूल
स्वर्णलीला इंग्लिश स्कूल, वणी
ग्रुप बी
स्कूल आॅफ स्कॉलर
यवतमाळ पब्लिक स्कूल
सुसंस्कार इंग्लिश स्कूल
लो.बा. अणे विद्यालय
ग्रुप सी
महर्षी विद्या मंदिर
शिवाजी विद्यालय
जायन्ट इंग्लिश स्कूल
लॉयन इंग्लिश स्कूल, वणी
सामना १५-१५ षटकांचा
प्रत्येक सामना १५-१५ षटकांचा होणार असून दररोज सकाळी ९ ते १२ व दुपारी १ ते ४ या वेळेत दोन सामने रंगणार आहेत. या खेळात प्रत्येक सामन्यात दोन या प्रमाणे दररोज चार लेदर बॉल आयोजकांकडून पुरविण्यात येणार आहे. पोस्टल ग्राऊंडमध्ये दोन हजार क्षमतेचे पे्रक्षागृह असून नव्यानेच करण्यात आलेल्या प्रेक्षागृहात पाच हजार प्रेक्षक बसू शकतील इतकी व्यवस्था असल्याने प्रेक्षक स्पर्धेचा यथेच्छ आनंद घेऊ शकतील.