यवतमाळच्या मातीची ताकद ‘लोकमत’

By Admin | Updated: June 8, 2017 01:30 IST2017-06-08T01:30:51+5:302017-06-08T01:30:51+5:30

यवतमाळच्या मातीत रुजून अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत करणारे ‘लोकमत’ आता वृत्तपत्र नव्हेतर जनचळवळ झाली आहे.

Yavatmal's soil power is 'Lokmat' | यवतमाळच्या मातीची ताकद ‘लोकमत’

यवतमाळच्या मातीची ताकद ‘लोकमत’

यवतमाळच्या मातीत रुजून अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत करणारे ‘लोकमत’ आता वृत्तपत्र नव्हेतर जनचळवळ झाली आहे. १९५२ साली यवतमाळातून सुरू झालेल्या साप्ताहिक लोकमतचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे. द्विसाप्ताहिक-दैनिक असा प्रवास करत आज घराघरात लोकमत पोहोचला आहे. एकापाठोपाठ एक यशोशिखर सर करणाऱ्या
लोकमतच्या अमरावती युनिटचा आज तिसरा वर्धापनदिन...

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नाव. गांधीजींच्या आवाहनावरून स्वातंत्र्य लढ्याच्या होमकुंडात स्वत:ला झोकून दिले. ११ आॅगस्ट १९४२ रोजी ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली. जबलपूरच्या तरुंगात २१ महिन्यांचा खडतर तुरुंगवास भोगला. या तुरुंगवासानंतर बाबूजींचे राष्ट्रप्रेम अधिकच तावून सलाखून निघाले. समाजासाठी झटणाऱ्या बाबूजींना पत्रकारितेची ओढ होती. जुलै १९४९ मध्ये त्यांनी ‘नवे जग’ साप्ताहिक सुरू करून पत्रकारितेत पाऊल ठेवले.
लोकनायक बापूजी अणे यांनी १९१८ पासून ‘लोकमत’ या नावाने साप्ताहिक सुरू केले होते. ब्रिटिश सरकारने १९३३ मध्ये बंद पाडले. बाबूजींनी अणे यांची भेट घेऊन बंद पडलेले लोकमत साप्ताहिक सुरू करण्याची परवानगी मागितली. १ मे १९५३ मध्ये यवतमाळातून लोकमत साप्ताहिक पुन्हा प्रकाशित होऊ लागले. एकप्रकारे एका जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. बाबूजींनी लोकमत साप्ताहिकाचे रूपांतर १९६० मध्ये द्वैसाप्ताहिकात केले. पंरतु बाबूजींना ते क्षेत्र अपुरे वाटत होते. लोकमतचे दैनिकात रूपांतर करून विदर्भाचा आवाज बुलंद करण्याचा त्यांनी निश्चिय केला आणि तो स्वप्नपूर्तीचा दिवस १५ डिसेंबर १९७१ उजाडला. दैनिक स्वरूपात लोकमत नागपूर येथून प्रकाशित होऊ लागले.
यवतमाळच्या मातीत रुजलेल्या या वृक्षाचा वटवृक्ष झाला. या वृक्षाच्या फांद्या केवळ महाराष्ट्राच्याच नव्हेतर गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशातही पसरल्या. लोकमतच्या जडणघडणीत गावागावातील एजंटांपासून ते पत्रपंडित पां.वा. गाडगिळ आणि बाबा दळवी यांचे मोठे योगदान आहे. वार्ताहर आणि एजंटांचे महाराष्ट्राच्या गावागावात जाळे पसरल्याने पहाटेच लोकमत वाचकांच्या हातात पोहोचतो. एजंट आणि वार्ताहरांचे परिश्रम आणि वाचकांचे प्रेम याच भरवशावर लोकमतने मराठी वृत्तपत्रसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले.
लोकमतने समाजमनाची नाडी पकडून नवनवीन प्रयोग केले. या काळात लोकमतच्या वैचारिक भूमिकेशी अनेकजन जुळले गेले. लोकमतने नवनवीन प्रयोग केले. मराठी वृत्तपत्रसृष्टीत प्रयोगशिल वृत्तपत्र म्हणून आजही लोकमतची वेगळी ओळख आहे. लोकमतने सर्वप्रथम तालुकास्तरावर आणि गावपातळीवर वार्ताहर नेमून ग्रामीण बातम्यांना हक्काचे स्थान दिले. स्वतंत्र जिल्हा कार्यालयाची संकल्पना लोकमतनेच अंमलात आणली. जिल्ह्याची स्वतंत्र पुरवणी काढणारे लोकमत हे देशातील पहिले वृत्तपत्र ठरले.

 

Web Title: Yavatmal's soil power is 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.