यवतमाळच्या साक्षी व सुषमाला ‘लोकमत’चा सखी सन्मान पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 22:04 IST2019-07-20T22:03:19+5:302019-07-20T22:04:40+5:30
गुणवत्ता पूर्ण कार्यातून कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांना ‘लोकमत’च्या सखी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यात यवतमाळ जिल्ह्यातील साक्षी मस्के आणि सुषमा मोरे या दोन युवतींचा सन्मान करण्यात आला.

यवतमाळच्या साक्षी व सुषमाला ‘लोकमत’चा सखी सन्मान पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गुणवत्ता पूर्ण कार्यातून कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांना ‘लोकमत’च्या सखी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यात यवतमाळ जिल्ह्यातील साक्षी मस्के आणि सुषमा मोरे या दोन युवतींचा सन्मान करण्यात आला. बुधवारी अमरावती येथील अभियंता भवनात हा शानदार सोहळा पार पडला.
लोकमत सखी मंच व आयआयडीएस यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले होते. लोकमतचे संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात झाली. मेळघाटात अतुलनीय कार्य करणाºया पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना यावेळी कमलताई गवई यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबाबत यवतमाळ जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील (पुसद) साक्षी प्रकाशराव मस्के हिला सन्मानित करण्यात आले. साक्षीने आफ्रिका (सामोआ देश) येथे झालेल्या कॉमनवेल्थ ज्युनिअर वेटलिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. शिवाय राष्ट्रीय स्तरावर दोन सुवर्ण पदके तर राज्य स्तरावर एक सुवर्ण पदक पटकाविले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.
तसेच शौर्य या वर्गवारीतून सखी सन्मान पुरस्कारासाठीही यवतमाळ जिल्ह्यातील सुषमा मोरे या युवतीची निवड करण्यात आली होती. सुषमा मोरे ही कळंब तालुक्यातील शिवपुरी गावाची रहिवासी आहे. या युवतीने महाराष्ट्र शासनाच्या मिशन शौर्य मोहिमेअंतर्गत जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले. ती सध्या कीटा कापरा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ११ व्या वर्गात शिकत आहे. तिच्या धाडसाचे कौतुक म्हणून ‘लोकमत’च्यावतीने तिला सखी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
साक्षी आणि सुषमा या दोघीही यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत. आपापल्या क्षेत्रात सातत्याने केलेले परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी यश मिळविले आहे. सामान्य कुटुंबात असलेल्या या दोघींनीही मिळविलेल्या यशाने यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.