नवे कृषी महाविद्यालय यवतमाळच्या पीकेव्हीत
By Admin | Updated: March 25, 2017 00:12 IST2017-03-25T00:12:24+5:302017-03-25T00:12:24+5:30
पालकमंत्री मदन येरावार यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यासाठी मंजूर झालेले शासकीय कृषी महाविद्यालय यवतमाळातच थाटले जावे,

नवे कृषी महाविद्यालय यवतमाळच्या पीकेव्हीत
पांढरकवडा, पुसदचाही पर्याय : राजकीय वजन ठरणार महत्वाचे
यवतमाळ : पालकमंत्री मदन येरावार यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यासाठी मंजूर झालेले शासकीय कृषी महाविद्यालय यवतमाळातच थाटले जावे, यासाठी जोर होत आहे. त्याच वेळी या महाविद्यालयासाठी पुसदमधील वरुड आणि पांढरकवडा तालुक्यातील केळापूरचा पर्यायही पुढे आला आहे.
जिल्ह्यातील अनेक रखडलेली प्रकरणे व विकास कामांच्या फाईली मार्गी लावण्याचा सपाटा पालकमंत्री मदन येरावार यांनी सुरू केला आहे. कोळंबी येथील दोन मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प, देवळी-यवतमाळ-घाटोळी (पुसद) ही २२३ केव्हीची उच्चदाब वीज वाहिनी, ५७५ कोटींचा मोतीराम लहाने कृषी समृद्धी प्रकल्प, एमआयडीसीतील टेक्सटाईल झोन व तेथीलच १३२ केव्ही वीज उपकेंद्र हे या मार्गी लागलेल्या अलिकडच्या कामांपैकी आहे. त्यात आता शासकीय कृषी महाविद्यालयाची भर पडली आहे. मदन येरावार यांना मिळालेल्या राज्यमंत्री आणि पालकमंत्रीपदाची ही उपलब्धी असल्याचे भाजपात मानले जाते. कृषी महाविद्यालयाला मंजुरी मिळताच ते कुठे थाटावे याची चर्चा सुरू आहे.
यवतमाळातील वाघापूर रोड स्थित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (पीकेव्ही) कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात हे शासकीय कृषी महाविद्यालय थाटले जावे, यासाठी पालकमंत्र्यांचे प्रयत्न आहेत. याच जागेला त्यांची पहिली पसंती आहे.
शासनाचे दुटप्पी धोरण
शासन प्राध्यापक नसल्याच्या कारणावरून अन्य महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याची कारवाई करते तर दुसरीकडे शासनाच्याच या जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची चार वर्षांपासून ही अवस्था आहे. या महाविद्यालयाची इमारत तयार आहे.
इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
२३ फेब्रुवारीला राज्यपाल तथा कुलपतींच्या हस्ते त्याचे उद्घाटनही होऊ घातले होते. मात्र सुरक्षेच्या कारणावरून हा दौरा पुढे ढकलला गेला. शुल्क अधिक राहत असल्याने दुर्गम भागात जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाला कमी प्रतिसाद मिळत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.
केंद्रीय कृषी विद्यालय नागपूरात?
शरद पवार कृषी मंत्री असताना देशात दोन केंद्रीय कृषी विद्यालय देण्याचे ठरले होते. त्यातील एक आंध्रात तर दुसरे यवतमाळात दिले जाणार होते. मात्र तो प्रस्ताव आजही थंडबस्त्यात आहे. ते महाविद्यालय आता नागपुरात द्यावे म्हणून मागणी होत आहे.
जिल्ह्यात पांढरकवडा, यवतमाळ, उमरखेड व दारव्हा तालुक्यात चार खासगी कृषी महाविद्यालय आहेत. यवतमाळात शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर झाल्याने त्याचा परिणाम खासगीच्या प्रवेशावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात दुसरे कृषी विज्ञान केंद्र पांढरकवडा तालुक्यात मंजूर झाले होते. परंतु नंतर ते रद्द झाले. हेच केंद्र आता दारव्हा तालुक्यात काँग्रेस नेत्यांनी खेचून आणले आहे. त्याच्या नोकर भरतीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
केळापुरात शासनाची १०० एकर जागा पडून
नव्या कृषी महाविद्यालयासाठी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील केळापूरचाही पर्याय पुढे आला आहे. काही वर्षांपूर्वी कृषी विद्यालय उघडण्यासाठी पारवेकर कुटुंबियांनी केळापूर येथे सलग असलेली १०० एकर जमीन शासनाला दान केली होती. ही जमीन अगदी राष्ट्रीय महामार्गावर आहे. शासनाच्या ताब्यात असलेल्या या जमिनीचा सध्या कोणताही वापर नसल्याने ती पडित आहे. तर पुसदच्या वरुड येथील ‘पीकेव्ही’च्या डेअरी तंत्रज्ञान महाविद्यालय परिसरावरही सशक्त पर्याय म्हणून ‘पीकेव्ही’त चर्चा होत आहे.
जैवतंत्रज्ञान महाविद्यालय प्रभारी प्राध्यापकांवर
वास्तविक वाघापूर रोडवरील कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरातच अलिकडेच मंजूर झालेले जैवतंत्रज्ञान महाविद्यालय सुरू आहे. या महाविद्यालयाचे वांधे आहे. मुळात त्याच वेळी शासकीय कृषी महाविद्यालय येथे होणार होते. परंतु हे महाविद्यालय आल्यास राजकीय नेत्यांच्या खासगी महाविद्यालयांची ‘दुकानदारी’ बंद होण्याच्या भीतीने त्याला विरोध झाला होता. त्यामुळे कृषी महाविद्यालयाऐवजी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय दिले गेले. चार वर्ष झाले आहे, विद्यार्थ्यांची पहिली तुकडी बाहेर पडणार आहे, परंतु अद्याप या महाविद्यालयाला प्राध्यापक नाहीत. ‘पीकेव्ही’मधून बदलीवर प्राध्यापक आणून कामकाज चालविले जात आहे. अन्य कर्मचारीही असेच ‘अॅडजेस्ट’ केले जात आहे. या महाविद्यालयात अद्याप एकाही प्राध्यापकाची नियुक्ती झाली नाही.