Yavatmal: अर्धवेळ नोकरीच्या नादात तरुणाने गमावले ११ लाख रुपये, टास्क देत ओढले ट्रेडिंगच्या जाळ्यात
By सुरेंद्र राऊत | Updated: August 17, 2023 21:03 IST2023-08-17T21:00:11+5:302023-08-17T21:03:13+5:30
Yavatmal Crime News: कोरोना काळापासून घरी बसून कंपनीत काम करणाऱ्या युवकाला व्हॉटस्ॲपवर आलेला मेसेज पडताळून त्याला रिप्लाय करणे चांगलेच महागात पडले.

Yavatmal: अर्धवेळ नोकरीच्या नादात तरुणाने गमावले ११ लाख रुपये, टास्क देत ओढले ट्रेडिंगच्या जाळ्यात
- सुरेंद्र राऊत
पुसद - कोरोना काळापासून घरी बसून कंपनीत काम करणाऱ्या युवकाला व्हॉटस्ॲपवर आलेला मेसेज पडताळून त्याला रिप्लाय करणे चांगलेच महागात पडले. सुरुवातीला टास्कच्या मोबदल्यात रोख पैसे मिळतील, ही अर्धवेळ नोकरी राहील, असे सांगत वेळोवेळी परतावा देत युवकाला ट्रेडिंग व क्वॉईनच्या जाळ्यात ओढले. नंतर त्याच्याकडूनच वेगवेगळ्या बहाण्याने पैसे वसूल केले. १० लाख ८५ हजारांची रोख गमावल्यानंतर त्या युवकाला आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.
नेहाल साहेबराव वराडे रा. मोतीनगर पुसद असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. नेहाल कोरोना काळापासून घरूनच आपल्या कंपनीत काम करीत होता. त्याला इंटरनेटवर असतानाच १६ जून रोजी व्हॉटस्ॲप मेसेज आला. तो संदेश त्याने पाहिला असता तो राधिका शर्मा नामक मुलीचा असल्याचे आढळले. त्याने तिच्यासोबत बोलचाल केली. तिने अर्धवेळ नोकरीचा प्रस्ताव ठेवला. एकूण १८ टास्क पूर्ण करण्यास सांगितले. प्रत्येकवेळी टप्प्याटप्प्याने याचा मोबदला दिला जाईल, असेही सांगितले. नेहालकडून याच बहाण्याने त्याचे बॅंक डिटेल्स काढून घेतले. सुरुवातीला प्रत्येक टास्क पूर्ण केल्यानंतर रक्कम त्याच्या खात्यात जमा होवू लागली. यामुळे नेहालचा विश्वासही बसत गेला. नंतर त्याला ट्रेडिंग कंपनीच्या ग्रुपमध्ये समाविष्ठ केल्याचे भासवत, त्याच्याकडून तेथेही टास्क करण्यात आले. परतावा कमी आणि त्याला पैसे गुंतविण्यास भाग पाडण्यात आले. हळूहळू करीत नेहालने तब्बल १० लाख ८५ हजार विविध खात्यातून यामध्ये गुंतविले. अखेर कुठलाच प्रतिसाद मिळणे बंद झाल्यानंतर नेहालने फसवणूक झाल्याची तक्रार पुसद शहर ठाण्यात दिली. त्यावरून अज्ञात दोघांविरुद्ध कलम ४२०, ३४ भादंविसह ६६ ड माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.