चीन युद्धात रसद पुरवणारा यवतमाळचा योद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:38 IST2017-08-15T00:38:09+5:302017-08-15T00:38:54+5:30

‘आम्ही विमानातून भारतीय सैन्याला शस्त्रास्त्र आणि अन्न धान्य पुरविण्यासाठी ‘अलाँग’ परिसरात पोहोचलो... ..

Yavatmal warrior preparing supplies for China war | चीन युद्धात रसद पुरवणारा यवतमाळचा योद्धा

चीन युद्धात रसद पुरवणारा यवतमाळचा योद्धा

ठळक मुद्देदेवीदास गोपालानी : डू आॅर डाय.. डोन्ट आस्क व्हाय.. हीच देशभक्ती!

स्वातंत्र्य दिन विशेष
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘आम्ही विमानातून भारतीय सैन्याला शस्त्रास्त्र आणि अन्न धान्य पुरविण्यासाठी ‘अलाँग’ परिसरात पोहोचलो... तेव्हा डोंगरांवरून भारताकडे सरकणारे चिनी सैनिक अगदी छोट्या खेळण्यांसारखे दिसले... मायभूमित घुसखोरी करणारे हे शत्रू पाहून रक्त तापले होते... खोल दºयांतून विमान घालून, जीव धोक्यात घालून आम्ही भारतीय सैनिकांना वेळेवर रसद पुरवित राहिलो.. डू आॅर डाय हेच आमचे देशभक्तीचे सूत्र होते. पण त्यापुढेही आम्हाला आदेश होता डोन्ट आस्क व्हाय!’
१९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या योद्ध्याचे हे खणखणीत अनुभवाचे बोल आहेत. आज वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या आणि अजूनही ठणठणीत असलेल्या या वीराचे नाव आहे देवीदास मेघराज गोपालानी! आज पुन्हा एकदा भारत आणि चीनचे संबंध तणावपूर्ण बनले असून ५५ वर्षानंतर दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे जाणवत आहे. त्या पार्श्वभूमिवर ‘लोकमत’शी बोलताना देवीदास गोपालानी यांनी आठवणी ताज्या केल्या. ते म्हणाले, ‘बासष्टमध्ये भारत युद्धासाठी तयार नव्हता. ज्या आसाम बॉर्डवर युद्ध झाले, तेथे रस्ते, अन्न, धान्य या सोयी-सुविधाच नव्हत्या. भारताकडे शास्त्रास्त्रांचा साठा नव्हता. नागरिकांना सोने मागून ते विकून सैन्यासाठी शस्त्रे घ्यावी लागली होती.
सरकारकडे विमानही नव्हते. पण आज आपण स्ट्राँग आहोत. तरी नो कंट्री वॉन्ट वॉन आॅन देअर ओन टेरीटरी. सर्वांना युद्धाचे दुष्परिणाम माहिती आहेत.’
१८ हजार फुटाच्या दरीतून उड्डाण!
आसाममध्ये युद्ध सुरू असताना रसद पुरविण्याची जबाबदारी सरकारने कलिंगा एअर लाईन्स कंपनीला दिली होती. या कंपनीत एअर मेंटनेंस इंजिनिअर असलेले यवतमाळचे देवीदास गोपालानी यांच्याकडे विमानाचा फिटनेस तपासण्याची जबाबदारी होती. पण ते प्रत्यक्ष विमानात युद्धभूमिवर पोहोचायचे. १८ हजार फूट दरीतून विमान उडविताना मरण समोर दिसायचे. आसामच्या धुवांधार पावसात अनेक विमान ‘क्रॅश’ झाल्याचे ते सांगतात. आकाशातून सैनिकांसाठी अन्नाची पाकिटे टाकण्याचे काम त्यांनी केले. आसामच्या अभावग्रस्त भागात विमान उतरण्यासाठी तात्पुरत्या लोखंडी पट्ट्या अंथरून धावपट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. त्या योग्य स्थितीत आहे की नाही, हे तपासण्याचे कामही गोपालानी यांच्याकडे आले. युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांचे कलेवर वाहून आणणे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याच्या कामातही गोपालानी आणि त्यांच्या सहकाºयांचा सहभाग होता.
विदर्भाच्या सैनिकाला हिरव्या मिरच्या दिल्या!
युद्धातील सैन्याला अन्न पुरविताना एकदा गोपालानी यांना वैदर्भी सैनिक भेटला. माझ्यासाठी तिखट पदार्थ आणा, अशी गळ त्याने घातली. तेव्हा गोपालानी यांनी खास त्याच्यासाठी हिरव्यागार मिरच्या नेल्या होत्या. मूळचे नागपूर येथील खान नावाचे अधिकारी गोपालानी यांचे कॅप्टन होते. नाईट फ्लाय करण्यात ते एक्सपर्ट होते. हरविलेले, दगावलेले सैनिक शोधण्यात ते सर्वात पुढे असायचे, असे देवीदास गोपालानी म्हणाले. डू आॅर डाय (करा किंवा मरा) यापुढे जाऊन आमच्यासाठी डोन्ट आस्क व्हाय (कशासाठी ते विचारू नका) अशी आॅर्डर असायची. कारण आम्ही अन्न घेऊन नाही गेलो तर भारतीय सैन्याच्या दोन-चार चौक्या उद्ध्वस्त होण्याचा धोका असायचा, असे त्यांनी सांगितले.
बॉर्डरवरील आदिवासी राष्ट्रभक्त
चिनीच्या युद्धात आसामच्या बॉर्डरवरील आदिवासींनी खरी देशभक्ती दाखविली. तेथे लढणाºया सैन्यासाठी काहीही करायला ते तयार असायचे. तेथे मीठ मिळत नव्हते. पण हे आदिवासी सैनिकांना मीठ पुरवायचे, असे देवीदास गोपालानी यांनी सांगितले.
चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकाच
चीन हा देश विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीच. बासष्टच्या युद्धात त्यांनी पाण्याच्या स्त्रोतांमध्ये विष कालवून भारतीय सैन्य मारले. आजही ते भारतीय माणसांचा तिरस्कार करतात. त्यामुळे आपण आपले देशप्रेम कायम ठेवून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकलाच पाहिजे, असे देवीदास गोपालानी म्हणाले. नव्या पिढीने जात पात, मतभेद बाजूला ठेवून देशासाठी एकजुटीने कुर्बानीसाठी तयारच राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Yavatmal warrior preparing supplies for China war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.