यवतमाळच्या चोरट्याला अमरावतीत रंगेहात अटक
By Admin | Updated: March 25, 2017 00:10 IST2017-03-25T00:10:17+5:302017-03-25T00:10:17+5:30
येथील अट्टल चोरट्याला मंगळसूत्र पळविताना अमरावतीच्या राजकमल चौकात रंगेहात अटक करण्यात आली.

यवतमाळच्या चोरट्याला अमरावतीत रंगेहात अटक
मंगळसूत्र, वाहन चोरी : चार दुचाकी जप्त
यवतमाळ : येथील अट्टल चोरट्याला मंगळसूत्र पळविताना अमरावतीच्या राजकमल चौकात रंगेहात अटक करण्यात आली. पोलीस तपासात तो मंगळसूत्रच नव्हे तर अट्टल वाहन चोर असल्याचेही निष्पन्न झाले असून त्याच्या कबुलीवरून चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.
दिलीप ऐकूनवार (२९) रा. यवतमाळ असे या चोरट्याचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी अमरावतीमधील गजबजलेल्या राजकमल चौकात ओरिसातील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकून पळ काढण्याचा प्रयत्न दिलीपने केला. मात्र नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्याला शहर कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. नंतर गुन्हे शाखेने त्याचा ताबा घेतला. तपासात त्याने आपण वाहन चोरीत सक्रिय असल्याची कबुली दिली. त्याने अमरावतीतून अनेक वाहने चोरली असून ती यवतमाळात विकली. त्याच्या कबुलीवरून अमरावतीच्या गुन्हे शाखा पथकाने यवतमाळातून चार वाहने जप्त केली आहेत. त्यामध्ये स्प्लेंडर (एम.एच-२७-एडब्ल्यू-७६७९), अॅक्टीव्हा (एम.एच.३१-बीडब्ल्यू-३५५८), हिरोहोंडा सीडी-१०० (एम.एच-२९-एम-९३०४) व स्प्लेंडर (एम.एच-३४-पी-८५५७) या वाहनांचा समावेश आहे. न्यायालयाने गुरुवारी त्याला पोलीस कोठडी सुनावली. तो सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. त्याच्याकडून वाहन व मंगळसूत्र चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अमरावतीच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुंडे अधिक तपास करीत आहे.