यवतमाळच्या टेक्सटाईल झोन उद्घाटनाची तयारी

By Admin | Updated: December 15, 2015 04:33 IST2015-12-15T04:33:36+5:302015-12-15T04:33:36+5:30

यवतमाळच्या ६९ हेक्टर क्षेत्रात प्रस्तावित टेक्सटाईल झोनची एमआयडीसीच्या डेप्युटी सीईओ पाठोपाठ उद्योग

Yavatmal Textile Zone inaugurated | यवतमाळच्या टेक्सटाईल झोन उद्घाटनाची तयारी

यवतमाळच्या टेक्सटाईल झोन उद्घाटनाची तयारी

यवतमाळ : यवतमाळच्या ६९ हेक्टर क्षेत्रात प्रस्तावित टेक्सटाईल झोनची एमआयडीसीच्या डेप्युटी सीईओ पाठोपाठ उद्योग खात्याच्या प्रधान सचिवांनीही पाहणी केली आहे. आता या टेक्सटाईल झोनचे विधिमंडळ अधिवेशन काळातच उद्घाटन करण्याची तयारी एमआयडीसीत सुरू आहे.
यवतमाळला मुख्यमंत्र्यांनी टेक्सटाईल झोनची घोषणा केली. नोव्हेंबरमध्ये या झोनच्या पाहणीसाठी एमआयडीसीचे मुंबई येथील डेप्युटी सीईओ गोविंद बोडखे यांच्या नेतृत्वातील चमू आली होती. या चमूने पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेबाबत आपला अहवाल उद्योग मंत्रालयाला सादर केला. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. अपूर्व चंद्रा यांनी यवतमाळ एमआयडीसीतील या टेक्सटाईल झोनला प्रत्यक्ष भेट देऊन जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उद्योग विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. टेक्सटाईल झोनमध्ये काय-काय पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत आणि त्या आपण किती दिवसात निर्माण करू शकतो, याचा आढावा त्यांनी घेतला. या पाहणीनंतर डॉ.अपूर्व चंद्रा यांनी टेक्सटाईल झोनच्या उद्घाटनाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे. प्रधान सचिव रवाना होताच यवतमाळात आता या टेक्सटाईल झोनच्या उद्घाटनाची तयारी केली जात आहे. त्याचा मुहूर्त अद्याप ठरला नसला तरी नागपुरात सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाच्या काळातच हे उद्घाटन घेण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती आहे. या अधिवेशनामुळे मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांना उद्घाटनासाठी यवतमाळात आणणे सहज शक्य होईल, असा उद्योग प्रशासनाचा अंदाज आहे. म्हणूनच अधिवेशन काळात हे उद्घाटन घेण्याचे प्रयत्न होत आहे. या उद्घाटनानंतर तातडीने पायाभूत सुविधांची उभारणी करुन दिली जाणार आहे. टेक्सटाईलवर आधारित उद्योग थाटण्यासाठी पुढे येणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या मागणीनुसार जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. टेक्सटाईल झोनची ही ६९ हेक्टर जागा पूर्वी इंडिया बुल्सच्या लुसिना पॉवर कंस्ट्रक्शनसाठी देण्यात आली होती. मात्र या कंपनीने वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांच्याकडून ही जागा काढून घेत टेक्सटाईल झोनसाठी आरक्षित करण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Yavatmal Textile Zone inaugurated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.