यवतमाळातील उपहारगृह आणि दुकानांवर धाडी
By Admin | Updated: December 2, 2014 23:13 IST2014-12-02T23:13:49+5:302014-12-02T23:13:49+5:30
शहरातील उपहारगृह आणि दुकानांवर धाडी घालून अन्न व औषध विभागाच्या पथकाने मंगळवारी तपासणी केली. तेथे खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी प्रचंड घाण आणि अस्वच्छता आढळून आली.

यवतमाळातील उपहारगृह आणि दुकानांवर धाडी
स्वच्छतेची तपासणी : प्रशासनाला अखेर जाग
यवतमाळ : शहरातील उपहारगृह आणि दुकानांवर धाडी घालून अन्न व औषध विभागाच्या पथकाने मंगळवारी तपासणी केली. तेथे खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी प्रचंड घाण आणि अस्वच्छता आढळून आली. एवढेच नव्हे तर सांडपाण्याची व्यवस्था केली गेली नसल्याने कुजलेल्या अन्नाची प्रचंड दुर्गंधी आढळून आले. ही कारवाई येथील बसस्थानक चौकात करण्यात आली. उशीरा का होईना, अन्न व औषध प्रशासनाला अखेर जाग आल्याने व्यावसायिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला लागून असलेले उपहारगृह आणि खाद्य पदार्थाच्या दुकानांमध्ये अस्वच्छता आहे. घाणीने बरबटलेल्या आणि कोंदट वातावरणात खाद्य पदार्थ तयार केले जात असल्याने ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ चालला असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून मंगळवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. व्ही. शिंदे आणि जि. पी. दंदे यांच्या पथकाने नितीन केशवलाल पंड्या यांच्या दुकानात धाड घातली. या दुकानातप्रचंड घाण व कोंदट वातावरण आढळून आले. एवढेच नव्हे तर डीझेलवर चालणारी भट्टीही आढळून आली. या भट्टीतून निघणाऱ्या धुराने संपूर्ण तळघरच काळवंडले होते. यावेळी पंचनामा करून उपहारगृहावर अन्न व सुरक्षा मानके कायद्याच्या ३२, ५६ आणि ६९ कलमान्वये कारवाई केली. त्यानंतर लगतच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)