यवतमाळ पब्लिक स्कूल ‘चॅम्पियन’
By Admin | Updated: November 23, 2014 23:28 IST2014-11-23T23:28:25+5:302014-11-23T23:28:25+5:30
क्रिकेटप्रेमींच्या गर्दीने खचाखच भरलेले पोस्टल मैदान. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी क्रिकेटपटूंची खेळी. चौकार आणि षटकारांवर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या टाळ्या. डीजे, बँडच्या तालावर आणि फटाक्यांच्या

यवतमाळ पब्लिक स्कूल ‘चॅम्पियन’
यवतमाळ : क्रिकेटप्रेमींच्या गर्दीने खचाखच भरलेले पोस्टल मैदान. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी क्रिकेटपटूंची खेळी. चौकार आणि षटकारांवर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या टाळ्या. डीजे, बँडच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत यवतमाळ प्रिमीअर लिग - २०१४ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या अंतिम सामन्यात यवतमाळ पब्लिक स्कूलच्या संघाने ३१ धावांनी जायंटस् इंग्लिश मीडियम स्कूल संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तेव्हा तर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती यवतमाळ पब्लिक स्कूलच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांच्या क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी यवतमाळ प्रिमीअर लिगचे आयोजन केले होते. येथील पोस्टल मैदानावर ९ नोव्हेंबरपासून या स्पर्धा रंगल्या. विविध १२ संघांनी चॅम्पियनसाठी प्रतिस्पर्धांना कडवी झुंज दिली. मात्र अंतिम सामन्यात पोहोचला तो यवतमाळ पब्लिक स्कूल आणि जायंटस् इंग्लिश मीडियम स्कूलचा संघ. रविवारी दुपारी १२.३० वाजता पोस्टल मैदानावर या दोन संघात सुरू झाले क्रिकेटचे युद्ध.
वायपीएस संघाने प्रथम फलंदाजी करीत १५ षटकात ५ बाद १०७ धावांचा डोंगर उभा केला. अथर्व तोडेने दमदार २४ तर देवांश मांगुळकरने सात चेंडूत आक्रमक १९ धावांचे योगदान दिले. प्रतिउत्तरादाखल जायंटस् संघ सुरुवातीपासून दबावात खेळताना दिसत होता. जायंटस् संघाने १०७ धावांचे आवाहन स्वीकारत फलंदाजीला सुरुवात केली. मात्र एकही खेळाडू अधिक वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. आदित्यने १६ धावा काढल्या. या संघाने १३.३ षटकात ७६ धावा काढीत पराभव स्वीकारला. शशांक महाजनने भेदक गोलंदाजी करीत १४ धावात ५ गडी बाद करीत वायपीएसच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
अंतिम सामन्यानंतर विजेत्या यवतमाळ पब्लिक स्कूल संघाला २१ हजार रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी तर उपविजेत्या जायंटस् इंग्लिश मीडियम स्कूल संघाला ११ हजार रुपये रोख व ट्रॉफी पद्मश्री दिलीप वेंगसरकर, लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, नगराध्यक्ष सुभाष राय, स्पर्धेचे मुख्य संयोजक किशोर दर्डा यांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून वायपीएसचा शशांक महाजन तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून स्कूल आॅफ स्कॉलर्सचा पराग कुळकर्णी यांना पुरस्कृत करण्यात आले.
(क्रीडा प्रतिनिधी)