यवतमाळ पोलिसांना तीन जिल्ह्यात मागणी
By Admin | Updated: February 18, 2017 00:07 IST2017-02-18T00:07:02+5:302017-02-18T00:07:02+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना निवडणूक बंदोबस्तासाठी ठाणे, अमरावती व अकोला जिल्ह्यातून मागणी आली आहे.

यवतमाळ पोलिसांना तीन जिल्ह्यात मागणी
निवडणूक बंदोबस्त : ठाणे, अकोला, अमरावती
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना निवडणूक बंदोबस्तासाठी ठाणे, अमरावती व अकोला जिल्ह्यातून मागणी आली आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा १६ फेब्रुवारीला पार पडला. दुसऱ्या टप्प्यात केवळ सहा गट व १२ गणांची निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. राज्याच्या अन्य भागातील महानगरपालिका व जिल्हा परिषदांची निवडणूक २१ फेब्रुवारीला होता आहे. त्यामुळे तेथे तगडा बंदोबस्त लागणार आहे. म्हणूनच यवतमाळ जिल्ह्यातून पोलिसांची मोठ्या प्रमाणात कुमक मागण्यात आली आहे. सुमारे ३० ते ४० अधिकारी-कर्मचारी ठाण्याला, २०० कर्मचारी अकोल्याला तर १०० कर्मचारी अमरावतीमध्ये पाठविण्याच्या सूचना महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्याची कुणकुण लागल्याने या बंदोबस्तात आपला नंबर लागू नये म्हणून काही संधीसाधू पोलीस कर्मचारी मुख्यालय व कार्यालय अधीक्षकांच्या अधिनस्त यंत्रणेच्या ‘टच’मध्ये असल्याची माहिती आहे. येत्या दोन दिवसात सर्व स्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)