यवतमाळ, नागपूर संघ अंतिम फेरीत दाखल
By Admin | Updated: March 5, 2017 01:05 IST2017-03-05T01:05:08+5:302017-03-05T01:05:08+5:30
येथील नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या विदर्भस्तरीय वरिष्ठ गट महिला हॉकी स्पर्धेत यजमान यवतमाळ संघाने

यवतमाळ, नागपूर संघ अंतिम फेरीत दाखल
विदर्भस्तर महिला हॉकी : तिसऱ्या स्थानासाठी गडचिरोली-अमरावती झुंजणार, आज समारोप व बक्षीस वितरण
यवतमाळ : येथील नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या विदर्भस्तरीय वरिष्ठ गट महिला हॉकी स्पर्धेत यजमान यवतमाळ संघाने अमरावती संघाचा, तर नागपूर संघाने बलाढ्य गडचिरोली संघाचा पराभव करून अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला. रविवारी, ५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता यवतमाळ-नागपूर असा अंतिम सामना रंगणार आहे.
हॉकी असोसिएशन आॅफ डिस्ट्रीक्ट यवतमाळ आणि वुमेन्स हॉकी क्लब यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सात संघांनी सहभाग नोंदविला आहे.
शनिवारी पहिला उपांत्य सामना नागपूर विरुद्ध गडचिरोली संघादरम्यान झाला. प्रारंभापासून नागपूर संघाने आक्रमक खेळ करून व्यूहरचना केल्या. सामन्याच्या ११ व्या मिनिटाला गडचिरोलीच्या पल्लवी मेश्रामने गोल करण्याची नामी संधी गमावली. त्यानंतर १४ व्या मिनिटात नागपूरच्या संगीता मेश्रामने दिलेल्या सुरेख पासच्या बळावर सुनीता यादवने संघासाठी पहिला गोल केला. त्यानंतर १९ व्या मिनिटात मोनू प्रधानने दुसरा गोल करीत नागपूर संघाला विजयी आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरानंतर गडचिरोली संघाने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. या स्पर्धेत जळगावचा संघ न आल्याने यजमान यवतमाळ संघाला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. उपांत्य सामन्यात त्यांनी अमरावती संघाचा १ विरुद्ध ० गोलने पराभव करून अंतिम फेरी गाठली. सुप्रिया पाईकराव हिने सामन्याच्या पहिल्याच मिनिटात विजयी गोल केला.
दरम्यान, सकाळच्या सत्रात गडचिरोली संघाने परभणी संघाचा ८ विरुद्ध ० गोलने दणदणीत पराभव केला. सोनाली हेमके हिने सर्वाधिक तीन गोल केले, तर अश्विनी गोंडोले, आंचल दोनाडकर यांनी प्रत्येकी २-२, तर प्रगती शेलोकार हिने १ गोल करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. नागपूर विरुद्ध चंद्रपूर विरूद्धच्या सामन्यात नागपूर संघाने ३ विरूद्ध ० गोलने विजय साजरा केला. अमरावती विरूद्ध भंडारा संघादरम्यान चुरशीचा सामना झाला. या सामन्यात अमरावती संघाने २ विरूद्ध १ गोलने विजय प्राप्त केला. भंडारा संघाच्या दीक्षा पचारेने ८ व्या मिनिटात पहिला गोल करून आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत आघाडी टिकून होती. त्यानंतर अमरावतीच्या शुभांगी हरणे हिने ३६ व्या मिनिटात गोल करून १-१ गोलने बरोबरी केली. ३९ व्या मिनिटात साक्षी जामनिलने दुसरा गोल करून अमरावती संघाचा विजय निश्चित केला.
या स्पर्धेत स्पर्धा निरीक्षक म्हणून विदर्भ हॉकी संघटनेचे प्रमोद जैन, प्रा. कुणाल पाटील जबाबदारी सांभाळत आहे. पंच म्हणून अतुल येवले, धनराज झोंबाडे यांनी काम पाहिले. रविवारी सकाळी ८ वाजता गडचिरोली विरूद्ध अमरावती संघादरम्यान तिसऱ्या स्थानासाठी सामना रंगणार आहे. बक्षीस वितरण व समारोप दुपारी १ वाजता होईल. (क्रीडा प्रतिनिधी)