उद्घाटनालाच संमेलनाच्या सौजन्याची समाप्ती, आयोजक आणि महामंडळाच्या चिखलफेकीवर रसिक संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 05:41 PM2019-01-08T17:41:51+5:302019-01-08T17:42:02+5:30

  यवतमाळ : हजारो विचारवंतांनी एकत्र येऊन मंथन करणे म्हणजे संमेलन. पण मेळाव्यात एकत्र येण्यापूर्वीच कुणाकुणाला बाजूला सारायचे, हा ...

Yavatmal Marathi Sahitya Sammelan News | उद्घाटनालाच संमेलनाच्या सौजन्याची समाप्ती, आयोजक आणि महामंडळाच्या चिखलफेकीवर रसिक संतापले

उद्घाटनालाच संमेलनाच्या सौजन्याची समाप्ती, आयोजक आणि महामंडळाच्या चिखलफेकीवर रसिक संतापले

Next

 यवतमाळ : हजारो विचारवंतांनी एकत्र येऊन मंथन करणे म्हणजे संमेलन. पण मेळाव्यात एकत्र येण्यापूर्वीच कुणाकुणाला बाजूला सारायचे, हा कुविचार ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कर्त्या आणि करवित्यांनी पुढे आणला आहे. नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन नंतर ‘येऊ नका’ म्हणण्याचा निर्लज्जपणा हा यवतमाळच्या मातीचा गुणच नव्हे. पण मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या पडद्यामागच्या वजिरांनी तो अवगुण यवतमाळकरांवर लादला. त्यामुळे संमेलनाच्या उद्घाटनातच साहित्यिकांच्या सौजन्याची समाप्ती झाली आहे. 

आपल्या गावात अखिल भारतातील सारस्वतांचा सोहळा होणार म्हणून यवतमाळचे रसिक सुखावले होते. मात्र पाहुण्यांंना निमंत्रण देऊन नंतर ते निमंत्रण रद्द करण्याची तथाकथित साहित्यिकांची मखलाशी सर्वसामान्य यवतमाळकरांना अजिबात रुचलेली नाही. झाल्या प्रकारावर साधा खेदही व्यक्त न करता संमेलनाचे स्थानिक आयोजक, स्वागताध्यक्ष आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष परस्परांवर चिखलफेक करण्यात मश्गूल आहेत. आपण एका प्रज्ञावंत महिलेचा देशभरापुढे अवमान केल्याचे दु:ख ना स्थानिक आयोजकांनी व्यक्त केले, ना महामंडळाच्या अध्यक्षांनी. उलट सहगल यांचे निमंत्रण अमक्यानेच रद्द केले हे पटवून देण्यात सारे शब्दाचे तारे तोडत आहेत.
 
सहगल यांचा अवमान झाल्यानंतर जवळजवळ सर्वच संवेदनशील साहित्यिकांनी यवतमाळच्या साहित्य संमेलनावर बहिष्काराची भाषा सुरू केली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांचा हेकेखोरपणाच या संमेलनाला नडला आहे. स्थानिक आयोजकांनी तर खुलेआम महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी हे साहित्य क्षेत्रातले हुकुमशाह हिटलर असल्याचे सांगितले. या सर्व प्रकाराबाबत जोशींनी केलेला खुलासाही अहंकाराने भरलेला होता. त्यांची भाषा मस्तवाल असल्याची टीका शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केली. गर्वात खुलासा करण्यापेक्षा त्यांनी महामंडळाची बैठक बोलावून विचारविनिमय केला असता तर साहित्यिकांची महाराष्टÑाची आणि यवतमाळचीही अब्रू वाचली असती, असे मत पवार यांनी व्यक्त केले. महामंडळाकडे जोपर्यंत स्वत:चा निधी उभा होणार नाही, तोपर्यंत साहित्य संमेलनात असे प्रसंग उद्भवणारच आहे, अशा प्रकारचा खुलासा करून जोशी यांनी साहित्य महामंडळ सरकारच्या दबावातच काम करते, हे स्पष्ट केल्याचे देवानंद पवार म्हणाले. 
 
संमेलनाची रया गेली, आता स्नेहसंमेलन भरवा 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आयोजकांनी शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांकडून रक्कम वसूल केली. मात्र त्यांच्या चुकांमुळे महाराष्टÑ भरातील साहित्यिकांनी संमेलनावरच बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे अखिल भारतीय संमेलनाची रया गेली आहे. विद्यार्थ्यांकडून गोळा झालेला पैसा आता संमेलनाऐवजी स्नेहसंमेलन भरुवून खर्च करावा, अशी मागणी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने केली आहे. साहित्य संमेलनासाठी भव्य मंडप घातला जात आहे. मात्र मंडप कितीही सजविला पण वºहाडीच नसतील तर त्या विवाह सोहळ्याला अर्थ उरत नाही. अनेक नगरपरिषद, जिल्हा परिषद शाळांमध्ये दिमाखदार स्नेहसंमेलने होऊ शकत नाही. त्यामुळे पालकमंत्री तथा स्वागताध्यक्षांनी साहित्य संमेलनाच्या मांडवातच विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन घ्यावे, अशी टीकाही शेतकरी आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी केली. 
 
नव्या उद्घाटकाचा शोध सत्कारणी लागणार का ? 
नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर संमेलनाचे आयोजक व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर टीकेची झोड उठली आहे. यातून सुटका करून घेण्यासाठी उद्घाटक म्हणून नवे नाव पुढे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या विषयावर स्थानिक आयोजन समिती व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा खल सुरु आहे.  ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, प्रसिद्ध साहित्यिक तथा लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, कवी विठ्ठल वाघ व अन्य तीन ते चार नावे महामंडळाला सूचविण्यात आल्याचे संमेलनाचे कार्यवाहक घनश्याम दरणे यांनी सांगितले. मात्र एका प्रज्ञावंत महिलेचा अवमान झाल्यानंतर दुसरा मान्यवर साहित्यिक उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारेल का? हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे.

Web Title: Yavatmal Marathi Sahitya Sammelan News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.