यवतमाळ बाजार समितीत लूट

By Admin | Updated: January 24, 2015 02:03 IST2015-01-24T02:03:45+5:302015-01-24T02:03:45+5:30

लिलाव म्हटला की स्पर्धा आलीच. मात्र केवळ दोन व्यापारी बोली बोलण्यासाठी उपलब्ध असतील तर ही स्पर्धाच संपुष्टात येते.

Yavatmal looted the market committee | यवतमाळ बाजार समितीत लूट

यवतमाळ बाजार समितीत लूट

यवतमाळ : लिलाव म्हटला की स्पर्धा आलीच. मात्र केवळ दोन व्यापारी बोली बोलण्यासाठी उपलब्ध असतील तर ही स्पर्धाच संपुष्टात येते. पर्यायाने शेतमालाचे भाव संगनमताने पाडून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हा प्रकार शुक्रवारी यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बघायला मिळाला. सोयाबीन आणि तूर या शेतमालाचे शेकडो ढीग ओट्यावर असताना केवळ तीन व्यापारी (त्यातही दोघे भागीदार) लिलावात बोली बोलत होते. सोन्यासारखा शेतमाल कवडीमोल भावात लिलाव केल्याचे पाहून एका शेतकऱ्याने तर चक्क माल विकायचा नाही, असे म्हणून संताप व्यक्त केला. मात्र या गंभीर बाबीकडे बाजार समिती प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. बहुदा हा प्रकार आर्थिक हितसंबंधातून चालत असावा, असाही संशय यावेळी उपस्थित होत होता.
निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. ऐनवेळी पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतमालाचे उत्पन्न घटले. कापूस आणि सोयाबीनने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांची तूर पिकावर भिस्त होती. सध्या तूर पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. सोयाबीन आणि कापूस ही पिके हातून गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी काढणी झाल्याबरोबर नड भागविण्यासाठी तूर विक्रीस आणण्याचा सपाटा चालविला आहे. काही शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक असल्याने त्याचीही आवक आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळीच वाहनाद्वारे, बैलगाडीने शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तूर विक्रीस आणली. पाहता पाहता बाजार समितीच्या आवारातील ओट्यांवर शेतकऱ्यांच्या मालाचे शेकडो ढीग लागले. मात्र रेकॉर्डवर असलेले परवानाधारक व्यापारी यावेळी उपस्थित नव्हते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास तुरीच्या लिलावाला सुरुवात झाली. मात्र केवळ तीन व्यापारी लिलावात सहभागी झाले. ‘एक ढीग तू आणि एक ढीग मी’ असा प्रकार साधारणत: त्या व्यापाऱ्यांमध्ये दिसून येत होता. तीनच व्यापारी असल्याने कुठलीही स्पर्धा नव्हती. त्यामुळे अपेक्षित भाव शेतकऱ्यांच्या मालाला मिळत नव्हते. तुरीच्या बाबतीत नव्हे तर सोयाबीनच्या बाबतीतही हाच प्रकार दिसून आला. बाजार समितीच्या रेकॉर्डवर परवानाधारक अनेक व्यापारी (खरेदीदार) आहेत. असे असताना केवळ तीन व्यापारीच बोली बोलत असताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. काही शेतकऱ्यांनी तर बाजार समितीच्या आणि व्यापाऱ्यांच्या साखळीची तीव्र शब्दात निंदा केली. बाजार समितीच्या प्रशासनाची सहमती असल्याशिवाय असा प्रकार घडू शकत नाही. लिलाव सुरू असताना त्यांनी या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे. खरेदीदार अत्यल्प असतील तर त्यांना जाब विचारला पाहिजे. तेव्हाच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य दर मिळतील, असा सूरही शेतकऱ्यातून यावेळी उमटत होता. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Yavatmal looted the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.