Yavatmal: नगरपरिषदेचा JCB वर्षभरापासून चालत होता खासगी कामावर, RTOने पकडल्यानंतर फुटले बिंग
By विशाल सोनटक्के | Updated: May 12, 2023 15:11 IST2023-05-12T15:10:17+5:302023-05-12T15:11:02+5:30
Yavatmal News: घनकचरा व्यवस्थापन तसेच शहरातील प्रभागांमध्ये वेगवेगळ्या कामाकरिता वापरण्यात येणारा नगरपरिषदेच्या मालकीचा जेसीबी तब्बल एक वर्षांपासून खासगी कामाकरिता वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

Yavatmal: नगरपरिषदेचा JCB वर्षभरापासून चालत होता खासगी कामावर, RTOने पकडल्यानंतर फुटले बिंग
- विशाल सोनटक्के
यवतमाळ - घनकचरा व्यवस्थापन तसेच शहरातील प्रभागांमध्ये वेगवेगळ्या कामाकरिता वापरण्यात येणारा नगरपरिषदेच्या मालकीचा जेसीबी तब्बल एक वर्षांपासून खासगी कामाकरिता वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी आता मुख्याधिकाऱ्यांनी यवतमाळ शहर ठाण्यात तक्रार दिली असून दोन आरोग्य निरीक्षकासह एकाजणाविरुद्ध पोलिस कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
यवतमाळ नगरपरिषदेचा मालकीचा एमएच-२९-एम-९५४९ क्रमांकाचा जेसीबी आहे. हाच जेसीबी वर्षभरापूर्वी आरोग्य विभागातील निरीक्षक प्रफुल्लकुमार जनबंधू व राहूल पळसकर यांच्या मार्फत पंकज बोपचे यांच्या रुद्रा गॅरेजमध्ये दुरुस्ती कामासाठी देण्यात आला होता. परंतु या जेसीबीचा बोपचे यांच्यामार्फत खासगी कामासाठी वर्षभरापासून वापर सुरू होता. मध्यंतरी यवतमाळ आरटीओने रस्त्यात हा जेसीबी पकडल्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला होता. त्यावेळी संबंधिताला तीन दिवसात नगरपरिषद कार्यालयात जेसीबी जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर १० मे रोजी नगरपरिषदेच्या वतीने कारणेदाखवा नोटीसही बजावण्यात आली. मात्र त्याचे कोणतेही उत्तर मिळाले नाही.
दरम्यान मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी कॉटन मार्केट परिसरातील रुद्रा गॅरेज येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर जेबीसी गॅरेज समोर उभा असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही आरोग्य निरीक्षकांनी नगरपरिषदेच्या मालमत्तेचा दुरुपयोग करून सदरचा जेसीबी पंकज बोपचे याच्यामार्फत खासगी कामाकरिता किरायाने वापरुन नगरपरिषदेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याची तक्रार आता मुख्याधिकाऱ्यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.