यवतमाळ हद्दवाढीची अखेर अधिसूचना जारी
By Admin | Updated: April 8, 2015 23:53 IST2015-04-08T23:53:57+5:302015-04-08T23:53:57+5:30
यवतमाळ शहरालगतच्या ग्रामपंचायती नगरपरिषदेत समाविष्ठ करून हद्दवाढ करण्यासंबंधी नगरविकास विभागाने अखेर २५ मार्च रोजी अधिसूचना जारी केली आहे.

यवतमाळ हद्दवाढीची अखेर अधिसूचना जारी
आक्षेप मागितले : जिल्हा परिषदेचे चार तर पंचायत समितीचे सात सदस्य बाद होणार
यवतमाळ : यवतमाळ शहरालगतच्या ग्रामपंचायती नगरपरिषदेत समाविष्ठ करून हद्दवाढ करण्यासंबंधी नगरविकास विभागाने अखेर २५ मार्च रोजी अधिसूचना जारी केली आहे. त्यावर पुढील ३० दिवसात आक्षेप मागण्यात आले आहे.
दरम्यान या हद्दवाढीमुळे लगतच्या ग्रामीण क्षेत्रातून जिल्हा परिषदेचे चार तर पंचायत समितीचे सात सदस्य बाद ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहे. तेथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलची नव्याने रचना करणार, पुढील निवडणुकीपर्यंत जुनेच सदस्य काम पाहणार की नव्याने निवडणुका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
फेब्रुवारीमध्ये हद्दवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार बायपास ते बायपास अशी नगर परिषदेची नवी हद्द प्रस्तावित केली. त्याबाबत आक्षेप मागितले गेले आहे. प्रस्तावानुसार वडगाव रोड, वाघापूर, मोहा, उमरसरा, पिंपळगाव, लोहारा या ग्रामपंचायत क्षेत्राचा नगरपरिषदेमध्ये समावेश करण्यात आला आहे. उपरोक्त ग्रामपंचायतींच्या महसुली हद्दीतील संपूर्ण क्षेत्र यात राहील. लोहाऱ्यातील औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्र मात्र यात समाविष्ठ राहणार नाही.
हद्दवाढीमुळे यवतमाळ नगरपरिषदेची वाटचाल महानगरपालिकेकडे सुरू असल्याचे मानले जाते. हद्दवाढीने शहरच नव्हे तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तसेच ग्रामपंचायतीच्या राजकारणावरही मोठा परिणाम भविष्यात पहायला मिळणार आहे. हद्दवाढीवर आता नागरिकांमधून काय काय आक्षेप येतात याकडे नजरा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)