ई-डिस्ट्रिक्टमध्ये यवतमाळ जिल्हा प्रथम
By Admin | Updated: November 27, 2015 02:42 IST2015-11-27T02:42:56+5:302015-11-27T02:42:56+5:30
ई-डिस्ट्रीक्ट योजनेअंतर्गत डिजीटल प्रमाणपत्राच्या वितरणात जिल्ह्याने विक्रमी कामगिरी केली आहे. ई-डिस्ट्रीक्ट योजनेस प्रारंभ झाल्यानंतर ....

ई-डिस्ट्रिक्टमध्ये यवतमाळ जिल्हा प्रथम
डिजिटल प्रमाणपत्रात विक्रम : विविध प्रकारचे दाखले घरबसल्या
यवतमाळ : ई-डिस्ट्रीक्ट योजनेअंतर्गत डिजीटल प्रमाणपत्राच्या वितरणात जिल्ह्याने विक्रमी कामगिरी केली आहे. ई-डिस्ट्रीक्ट योजनेस प्रारंभ झाल्यानंतर बऱ्याच मागे असलेला जिल्हा राज्यात प्रमाणपत्र वाटपात पहिल्या क्रमांकावर तर आलाच शिवाय दोन नंबरवर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यास तब्बल साडेतीन हजार प्रमाणपत्राने मागे टाकून ई-डिस्ट्रीक्ट योजनेत राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
ई-डिस्ट्रीक्ट योजनेस जिल्हयात खऱ्या अर्थाने नोव्हेंबर २०१३ मध्ये सुरुवात झाली. सर्वसामान्य नागरिकांना सहज प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणाऱ्या या उपक्रमाने गेल्या अवघ्या काही महिन्यात राज्यात पहिला क्रमांक मिळविण्यासोबतच सात लाख ८५ हजारांवर प्रमाणपत्र वितरणाचा उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे प्रमाणपत्र वितरणात दुसऱ्या क्रमांकावर असलेला अहमदनगर हा जिल्हा वितरणाच्या बाबतीत जिल्ह्याच्या निम्यातच असून इतर जिल्हेही त्यापेक्षा कमी आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वसामान्य नागरिकांना वारंवार लागणारे आणि महत्वाचे दाखले तातडीने देता यावे म्हणून शासनाने डिजीटल पद्धत अस्तित्वात आणली आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने या पद्धतीचा चांगल्याप्रकारे अवलंब करण्यात आल्याने अवघ्या काही महिन्यात या जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. नागरिकांना घरबसल्या ई-पद्धतीने विविध प्रकारचे दाखले मिळावे, दाखले वाटपातील विलंबता कमी होऊन त्यात पारदर्शकता यावी, ई-सेतू, महाआॅनलाईनमार्फत व्हीएलसी केंद्र सुरू केले. शासनाने विविध पाच प्रकारचे दाखले डीजीटल पद्धतीने देण्यास प्रारंभ केला आहे. त्यात उत्पन्न दाखला, अॅफिडेव्हिट, रहिवासी दाखला आदी दाखल्यांचा समावेश आहे. या पद्धतीने दाखले वितरीत करावयास प्रारंभ झाल्यानंतर यवतमाळ जिल्हा हा २०१३ मध्ये बाविसाव्या क्रमांकावर होता. त्यानंतर या कामास गती देण्यात आल्याने डिजीटल प्रमाणपत्र वितरित करुन जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर पोहचला आहे. (प्रतिनिधी)