यवतमाळ विधानसभेत महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांत झाली काट्याची टक्कर, बाजी शिवसेनेचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 23:18 IST2019-05-23T23:16:57+5:302019-05-23T23:18:18+5:30
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात यावेळी लोकसभा निवडणूक पार पडली. गेल्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत मोदी लाटेचा फारसा कुठेही मागमूस दिसला नाही. मात्र जनतेच्या मनात काय दडले होते, ते आता उघड झाले. जनतेने पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवार शिवसेना नेत्या भावना गवळी यांच्या बाजूने कौल दिला.

यवतमाळ विधानसभेत महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांत झाली काट्याची टक्कर, बाजी शिवसेनेचीच
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात यावेळी लोकसभा निवडणूक पार पडली. गेल्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत मोदी लाटेचा फारसा कुठेही मागमूस दिसला नाही. मात्र जनतेच्या मनात काय दडले होते, ते आता उघड झाले. जनतेने पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवार शिवसेना नेत्या भावना गवळी यांच्या बाजूने कौल दिला. त्यांनी महाआघाडीचे दिग्गज उमेदवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा दणक्यात पराभव केला. यवतमाळ-वाशिम या मतदार संघातून भावना गवळी यांनी विजयाची हॅटट्रीक केली आहे. या मतदार संघातून तिसऱ्यांदा, तर एकूण पाचव्यांदा त्या लोकसभेत पोहोचणार आहे. यवतमाळ-वाशिम मतदार संघापूर्वी त्यांनी तत्कालीन वाशिम मतदार संघातूनही दोनदा विजय मिळविला होता, हे विशेष.
यावेळची लोकसभा निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली. मागील निवडणुकीप्रमाणे यावेळी कुठेही मोदी लाट दिसली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर लोकसभा मतदार संघात येणाºया जिल्ह्यातील पांढरकवडा येथे जाहीर सभा घेतली होती. विशेष म्हणजे २०१४ मध्येसुद्धा मोदी यांनी याच मतदार संघातील आर्णी तालुक्यातील दाभडी येथे सभा घेऊन देशभरातील शेतकऱ्यांची संवाद साधला होता. ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून त्यांनी त्यावेळी लोकसभेचे बिगुल फुकले होती. त्याचीच पुनरावृत्ती त्यांनी यावेळी केली. केवळ जागा बदलली. या सभेनंतरच निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाली.
राज्यात भाजप आणि शिवसेना युती झाली अन् पुन्हा एक्दा शिवसेनेने भावना गवळी यांना उमेदवारी घोषित केली. त्यांनी उमेदवारी घोषित होताच जोमाने मतदार संघात प्रचाराला सुरूवात केली. अनेक गावांमध्ये रॅली काढली. थेट जनतेशी संवाद साधला. यवतमाळ विधानसभा मतदार संघातूनच त्यांनी प्रचाराची पूर्ण रणनिती आखली. यवतमाळ विधानसभा मतदार संघात काट्याची लढत झाली. मात्र अंतिमत: भावना गवळी यांनीच बाजी मारली. विशेष म्हणजे याच मतदार संघात पालकमंत्री, महसूल राज्यमंत्र्यांचे वास्तव्य असल्याने त्यांना मोठ्या मताधिक्क्याची अपेक्षा होती.
आता विधानसभा निवडणुकीत येणार आणखी रंगत
२0१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयाचा आता लगेच चार महिन्यांनी होणाºया विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा भाजप-शिवसेनेची युती झाल्यास जिल्ह्यातील उमेदवार ठरविताना त्यांच्या शब्दाला मोठी किंमत राहणार आहे. विशेष म्हणजे सध्या भाजपच्या ताब्यात असलेले जिल्ह्यातील काही विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे घेण्यासाठी त्यांचा विजय मोलाचा ठरणार आहे. जिलह्यातील शिवसेनेला पुन्हा नवी उभारी देण्यासाठी त्यांचा विजय कामी येणार आहे.