यवतमाळात उद्योजकाकडे ११ लाखांची घरफोडी
By Admin | Updated: June 8, 2017 00:23 IST2017-06-08T00:23:18+5:302017-06-08T00:23:18+5:30
राजस्थानात देवदर्शनासाठी गेलेल्या उद्योजकाचे घर फोडून चोरट्यांनी ११ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

यवतमाळात उद्योजकाकडे ११ लाखांची घरफोडी
धामणगाव मार्गावरील घटना : देवदर्शनाला गेल्याची संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राजस्थानात देवदर्शनासाठी गेलेल्या उद्योजकाचे घर फोडून चोरट्यांनी ११ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना येथील धामणगाव मार्गावर मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. मात्र घर मालक बाहेरगावी असल्याने या घटनेची तक्रार बुधवारी देण्यात आली.
धामणगाव मार्गावर उद्योजक प्लास्टिक प्लॉन्टचे संचालक रवी मुक्तीलाल जयपुरिया यांचा बंगला आहे. आठवडाभरापूर्वी ते सहपरिवार जीन माता दर्शनासाठी राजस्थानातील सिकर येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी एका चौकीदाराला अधूनमधून घराकडे लक्ष देण्याची जबाबदारी सोपविली. मंगळवारी सायंकाळी हा चौकीदार जयपुरिया यांच्या घरी गेला असता त्याला घराचे कुलूप तुटलेले आढळले. या घटनेची माहिती लगेच त्यांचे बंधू किशोर जयपुरिया यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ यवतमाळ शहर ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. मात्र नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला हे माहीत नसल्याने तक्रार नोंदविली गेली नाही.
बुधवारी सकाळी रवी जयपुरिया यवतमाळात दाखल झाल्यानंतर नेमके काय चोरीस गेले याची पाहणी केली. त्यानंतर शहर ठाण्यात तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, ठाणेदार यशवंत बावीस्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली. विविध शोध पथकांच्या अधिकाऱ्यांनी गुन्ह्याच्या पद्धतीचे अवलोकन केले तसेच ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केले.
३१ मे ते ६ जून दरम्यान ही घरफोडी झाल्याचा अंदाज आहे. नेमकी चोरीची घटना कधी घडली याचा पोलीस शोध घेत आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश हिवसे यांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
पाच किलो चांदी
सोन्याची चेन, ब्रेसलेट, सोन्याचे नाणे, बांगड्या, कानातले रिंग, चांदीचे नाणे, चांदीचे ग्लास, चमचा, कटोरा, चांदीच्या विटा असा ११ लाख पाच हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार आहे. यात ३०० ग्रॅम सोने आणि पाच किलो चांदीचा समावेश आहे.
आकडा वाढण्याची चिन्हे
चोरी गेलेल्या मुद्देमालाची अद्याप मोजदाद झालेली नाही. त्यामुळे ही चोरी २० लाख रुपयांच्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. अलिकडच्या काळातील ही शहरातील मोठी चोरी असून चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.