कळंब, यवतमाळ येथे प्राप्तिकर विभागाची धाड
By Admin | Updated: March 2, 2017 00:48 IST2017-03-02T00:48:49+5:302017-03-02T00:48:49+5:30
येथील नागपूर रोडस्थित एम.पी.वाईन शॉप आणि त्यांच्या यवतमाळातील घरावर मंगळवारी दुपारी प्राप्तिकर विभागाच्या पथकाने धाड घातली.

कळंब, यवतमाळ येथे प्राप्तिकर विभागाची धाड
कळंब : येथील नागपूर रोडस्थित एम.पी.वाईन शॉप आणि त्यांच्या यवतमाळातील घरावर मंगळवारी दुपारी प्राप्तिकर विभागाच्या पथकाने धाड घातली. त्यात अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. मात्र वाईन शॉप मालकाने ही धाड नसून रूटीन तपासणी असल्याचे सांगितले.
आयकर विभागाच्या पथकाने दुकानदाराच्या बँक खात्याची माहिती घेतली. विशेष म्हणजे यामध्ये नोटाबंदीच्या काळात करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहाराची तपासणी केल्याची माहिती आहे. तसेच वाईन शॉपच्या व्यवहाराची माहिती घेत कागदपत्रांची तपासणी केली. या धाडीत पथकाला कोणते आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाली, याची कुठलीही माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर पथकाने यवतमाळ येथील मनीष जयस्वाल यांच्या घरी असलेल्या कार्यालयात पोहोचून कागदपत्रांची माहिती घेतल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान वाईन शॉपवर धाड पडल्याची माहिती मिळताच कळंब येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पटापट बंद केली. यामध्ये हार्डवेअरची दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. तर काहींनी आयकर विभागाचे अधिकारी कळंब येथून निघून गेल्यानंतर दुकाने सुरु केली. या धाडीमुळे कळंब शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
यासंदर्भात वाईन शॉपचे संचालक मनीष जयस्वाल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा सर्व प्रकार रुटीन असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी ज्या कागदपत्रांची मागणी केली, त्यानुसार त्यांना ती देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.
(तालुका प्रतिनिधी)