वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील जखमा ओल्याच
By Admin | Updated: November 9, 2014 22:34 IST2014-11-09T22:34:36+5:302014-11-09T22:34:36+5:30
पाळीव प्राण्यांप्रमाणेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या उपचाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या जखमांना टाके घालण्यासाठी आवश्यक असलेले अॅन्टी रॅबीज सिरम संपूर्ण राज्यातच उपलब्ध

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील जखमा ओल्याच
सुरेंद्र राऊत - यवतमाळ
पाळीव प्राण्यांप्रमाणेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या उपचाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या जखमांना टाके घालण्यासाठी आवश्यक असलेले अॅन्टी रॅबीज सिरम संपूर्ण राज्यातच उपलब्ध नसल्याने आता या जखमा उघड्या ठेवण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे. गेल्या महिन्याभरापासून या अॅन्टी रॅबीज सिरमचा तुटवडा असूनही याबाबत शासनस्तरावरून कोणताच पाठपुरावा करण्यात आलेला नाही.
वन्य श्वापदांच्या हल्ल्यात झालेल्या जखमांना टाके घालता येत नाही. त्यासाठी आधी अॅन्टी रॅबीज सिरम हे इंजेक्शन जखमेच्या भोवती द्यावे लागते. त्यानंतरच त्या जखमेला टाके घालता येतात. असे न करता जखमांना टाके घातल्यास रॅबीजचे जंतु वाढण्याची भीती असते. बंद जखमेत रॅबीजच्या जंतुची मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळेच वाघ, बिबट, आस्वल, रानडुक्कर, तडस, लांडगा या श्वापदांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचार करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
अॅन्टी रॅबीज सिरम ही लस खासगीत मिळत नाही. भारत सिरम नावाच्या कंपनीकडून या लसीचा पुरवठा केला जात होता. मात्र या कंपनीने महिन्याभरापासून हा पुरवठा बंद केल्याने सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. सिरम उपलब्ध नसल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या जखमा अद्यापही भळभळत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात सदोबा सावळी वन परिक्षेत्रातील माळेगाव येथे आस्वालाने हल्ला करून शिवाजी चौधरी (३२) याच्या डोक्याला चावा घेतला. यात शिवाजीच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली. त्याला उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी या रुग्णाला उपलब्ध असलेले अॅन्टी रॅबीज व्हॅक्सीन दिले. मात्र डोक्याची जखम शिवण्यासाठी आवश्यक असलेले सिरम उपलब्ध नसल्याने शेवटी या रुग्णाला नागपूर येथे हलविण्यास सांगितले. आर्थिक स्थिती नसतानाही सदर रुग्णाला वर्धा आणि त्यानंतर नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविण्यात आले. मात्र येथेही अॅन्टी रॅबीज सिरम नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याच्या जखमांवर टाके घालण्यात आले नाही. तो गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.