खड्डेमुक्तीसाठी रस्त्याची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:17 IST2017-12-12T22:17:23+5:302017-12-12T22:17:40+5:30
खड्डेमय रस्त्यावरून वाट काढताना होणारा त्रास पाथ्रड (गोळे) येथील विद्यार्थिनींनी अनोखे आंदोलन करून प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला.

खड्डेमुक्तीसाठी रस्त्याची पूजा
आॅनलाईन लोकमत
नेर : खड्डेमय रस्त्यावरून वाट काढताना होणारा त्रास पाथ्रड (गोळे) येथील विद्यार्थिनींनी अनोखे आंदोलन करून प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. खड्ड्यांची पूजा करून अपघात होऊ नये यासाठी धावा करण्यात आला. यानंतर नेर येथे आढावा बैठकीसाठी आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे व तहसीलदार अमोल पोवार यांना निवेदन देण्यात आले.
या गावातील विद्यार्थिनी वटफळी येथे शिक्षणासाठी जातात. मंगळवारी त्यांनी वटफळी रस्त्याची दुर्दशा आणि होत असलेला त्रास, याविषयी प्रश्न मांडला. शहरातील छोटेछोटे खड्डे लगेच बुजविले जातात. ग्रामीण भागातील मोठमोठे खड्डे का बुजविले जात नाही, असा प्रश्न करून शासनाचे याकडे लक्ष वेधले. त्यांनी खड्ड्यांची पूजा केली. ‘हे खड्डा तुझ्यामूळे कोणता अपघात होऊ नये’ असा धावा करून अनोखे आंदोलन केले.
आढावा बैठकीला आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. सदर रस्त्याची दुरुस्ती दोन महिन्यात केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. आंदोलनात सावित्रीबाई फुले मंडळाच्या अध्यक्ष नीलिमा अडमाते, तेजस्विनी येंडे, मयूरी गावंडे, लोचना कोळवते, शुभांगी पिल्लारे, संजना गोळे, सोनाली झाडे, पूजा ढोरे, योगीता पिल्लारे, दीपाली पिल्लारे, नम्रता मडकान, सीमा चव्हाण, नीता राठोड, रेश्मा ठाकरे, तनवी कोलावते, निकिता गावंडे आदींनी सहभाग घेतला.
पाथ्रड (गोळे) येथे मुख्यमंत्री दूत किरण घोरफडे यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थिनींचे मंडळ तयार करण्यात आले. सावित्रीबाई फुले किशोरी मंडळ, असे त्याला नाव देण्यात आले. दर रविवारी मंडळातील विद्यार्थिनींची बैठक होते. यात करिअर, गावातील स्वच्छता, हागणदारीमुक्ती आदी विषयांवर चर्चा केली जाते. मंडळातील सदस्य दररोज गावातील रस्त्यांची स्वच्छता करतात. योगशिबिर घेतात. मुख्यमंत्री दूत किरण घोरफडे हे ग्रामसभेत ग्रामस्थांना ग्रामसभेचे महत्व सांगतात. यासाठी या गावातील रहिवासी व नेर पंचायत समितीच्या सभापती मनीषा गोळे यांचे सहकार्य लाभत असल्याचे नीलिमा अडमाते यांनी सांगितले.