पूजाचा मोडलेला संसार शिक्षकाने सावरला
By Admin | Updated: December 17, 2015 02:37 IST2015-12-17T02:37:30+5:302015-12-17T02:37:30+5:30
पतीच्या आकस्मिक निधनामुळे मोडलेला पूजाचा संसार एका शिक्षकाने घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा उभा राहिला.

पूजाचा मोडलेला संसार शिक्षकाने सावरला
किन्हीचा तरूण : तीनही कुटुंबातील सदस्य आणि मान्यवरांच्या साक्षीने झाला विवाह
पांढरकवडा : पतीच्या आकस्मिक निधनामुळे मोडलेला पूजाचा संसार एका शिक्षकाने घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा उभा राहिला. तीनही कुटुंबाच्या साक्षीने मंगळवारी केळापूर येथील जगदंबा मंदिरात अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडला. योगायोगाने का होईना जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार, सूर्यकांत गाडे पाटील, डॉ. महानूर, साहेबराव पवार ही मंडळी या आदर्श विवाहाची साक्षीदार ठरली.
घाटंजी तालुक्याच्या आकपुरी येथील पूजा या पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवतीचा विवाह आर्णी तालुक्याच्या आयता येथील मंगेश नामक शिक्षकाशी झाला. या दोघांच्या संसारवेलीवर अन्वीन नावाचे फुलही उमलले. त्यांचा संसार सुखात, आनंदात सुरू असताना मंगेशवर काळाने झडप घातली. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या संसाराचे एक चाक निखळले. पूजा आणि अन्वीन हे दोघेही पांढरकवडा येथे वास्तव्याला गेले.
पूजाचा संसार पुन्हा उभा राहावा, यासाठी समाज आणि कुटुंबातील मंडळींनी पुढाकार घेतला. दरम्यान, घाटंजी तालुक्याच्या किन्ही येथील घनश्याम कचरे या शिक्षकापुढे पूजाशी विवाह करण्याचा प्रस्ताव त्याच्या नातेवाईकांनी ठेवला. युग निर्माण विजाभज प्राथमिक आश्रमशाळेत कार्यरत असलेल्या घनश्यामनेही या प्रस्तावाला हो भरला. अतिशय साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय पूजा आणि घनश्यामच्या नातेवाईकांनी घेतला. यासाठी केळापूर येथील जगदंबा संस्थान हे स्थळ निश्चित करण्यात आले. बुधवारी पूजा आणि घनश्यामचा विवाह पार पडला. यावेळी पूजा, मंगेश आणि घनश्याम या तिघांच्याही कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती.
जगदंबा मंदिर परिसरात आप्तस्वकीय आणि मित्र मंडळींच्या साक्षीने या दोघांचा हा विवाह सोहळा पार पडला. या विवाहाने समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. (शहर प्रतिनिधी)