तहसीलच्या चुकीच्या धोरणाचा मजुरांना फटका
By Admin | Updated: May 7, 2015 01:49 IST2015-05-07T01:49:53+5:302015-05-07T01:49:53+5:30
यवतमाळ जिल्हा हा सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून सध्या प्रसिद्ध आहे.

तहसीलच्या चुकीच्या धोरणाचा मजुरांना फटका
उमरखेड : यवतमाळ जिल्हा हा सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून सध्या प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात अशी स्थिती असताना उमरखेड तालुक्यात सुरू असलेल्या पांदण रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांना चार महिन्यांपासून तहसील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मजुरीच मिळाली नाही. त्यामुळे या कामावरील मजुरांवर आत्महत्येची पाळी आली आहे.
या सर्व परिस्थितीला उमरखेड तहसील प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. उमरखेड तालुक्यात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमार्फत मजुरांच्या हाताला काम मिळावे व त्यांच्या कुटुंबाचा गाडा योग्यरित्या चालावा, हे धोरण समोर ठेवून शासनाने ही योजना तीन वर्षांपासून राबविणे सुरू केले आहे. त्यातूनच तालुक्यातील मानकेश्वर, परजाना, साखरा, ब्राह्मणगाव, बेलखेड, झाडगाव, मुळावा, वानेगाव, आदींसह इतरही गावांचे पांदण रस्ते मजुरांच्या सहाय्याने पूर्णत्वास नेले जात आहे. या रस्त्यावर काम सुरू आहे. मजूरही कामावर जातात. या कामावर जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग लक्ष ठेवून आहे.
काम करणाऱ्या मजुरांचे मजुरी रेकॉर्ड जॉब कार्ड, पासबुक व आधार कार्ड आदींचे रेकॉर्ड मेंटेन केले जात आहे. नोंदणी रजिस्टर घेऊन प्रत्येक गावातील रोजगार सेवक हे उमरखेड तहसीलमध्ये येऊन डाटा आॅपरेटरकडून आॅनलाईन करून घेण्यासाठी येतात. ते आॅनलाईन झाले तरच मजुरांच्या खात्यात त्यांच्या मजुरीचे पैसे जमा होतात. परंतु गेल्या चार महिन्यांपासून रोजगार सेवक हे उमरखेड तहसील कार्यालयामध्ये केवळ येरझारा मारत आहेत. तहसीलमध्ये असलेला कंत्राटी डाटा आॅपरेटर विजय माळवे हा त्याला पूर्ण भरलेल्या फॉर्ममध्येही त्रुटी असल्याचे सांगतो. तर कधी मला वेळ नाही, कधी आॅनलाईनच बंद आहे, अशी कारणे देऊन हेतुपुरस्सर मजुरांची मजुरी आॅनलाईन काढण्यामध्ये दिरंगाई करतो.
या संदर्भात रोजगार सेवक व मजुरांनी उमरखेडचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना माहिती दिली आहे. परंतु त्यांनीसुद्धा या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मजूर वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे. पैशासाठी तहसीलमधील आॅपरेटरकडून लोकांना नागविले जात आहे. त्यामुळे उमरखेड तालुक्यातील चालू असलेली रस्त्याची कामे अर्धवट राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्यासत्र सुरूच आहे. असे असताना तहसीलच्या या अनागोंदी कारभारामुळे मजूर वर्गावरही आत्महत्येची पाळी आली आहे.
(शहर प्रतिनिधी)