Workers' fasting session in ST | एसटीमध्ये कामगारांचे उपोषण सत्र
एसटीमध्ये कामगारांचे उपोषण सत्र

ठळक मुद्देअन्यायाची मालिका : प्रमुख अधिकाऱ्यांकडून परिपत्रकांचा बे्रक डाऊन, नियम धाब्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात कामगारांचे उपोषण सत्र सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप करत आंदोलन केले जात आहे. सामान्य कामगारांवर होत असलेला अन्याय दबावात की आर्थिक हित जोपासत केला जात आहे, याचा शोध मध्यवर्ती कार्यालयाने घ्यावा, अशी अपेक्षा कामगारांना आहे.
कामगारांची बलाढ्य संघटना असलेल्या कामगार संघटनेलाही न्याय मिळवून घेण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागत आहे. भर उन्हात या संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी दोन दिवस साखळी उपोषण केले. कामगारांचे अनेक प्रश्न असले तरी, बढती आणि बदल्यांमध्ये अन्याय होत असल्याची ओरड आहे. विभाग नियंत्रकांकडून पक्षपाती धोरण राबविले जात असल्याची ओरड आहे. त्याला बराच आधारही आहे.
या विभागात बढती व बदल्यांची मोठी घाई सुरू आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात ही प्रक्रिया सुरू आहे. कुणाला लाभ होईल, अशी कृती आचारसंहितेत केली जाऊ नये, असे संकेत आहे. एसटीने मात्र हे संकेत पायदळी तुडविले आहे. बढती, बदलीचे अधिकार असलेल्या अधिकाºयांना ही घाई का व्हावी, हा प्रश्न आहे. परिपत्रक डावलून बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. वाहतूक नियंत्रक पदावर बढती आणि बदली संदर्भात विभाग नियंत्रकांनी घेतलेली भूमिका अनेक शंकांना जन्म देणारी आहे.
वाहतूक नियंत्रक पदावर बढती देताना बदलीही करण्यात आली. मात्र यातील काही जण बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाही. अंतिम संधीच्या पत्रालाही त्यांनी जुमानले नाही. अखेर एसटीने अशा कामगारांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी दिले. यात झालेल्या पक्षपाताविरुध्द एका कामगाराने उपोषण सुरू केले होते. अवघ्या तीन तासात त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. त्यांना न्यायाची प्रतीक्षा आहे. कामगारांवर सातत्याने न्यायासाठी लढा द्यावा लागत आहे. महिनाभरात उपोषणाचे तीन मंडप एसटी विभागीय कार्यालयासमोर पडले. अन्यायाची मालिका कुठेतरी थांबावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संदर्भात मध्यवर्ती कार्यालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यवतमाळ विभागातील सर्व आगार तोट्यात आहेत. नियोजनाचा अभावही या बाबीला कारणीभूत आहे. अधिकाºयांकडून मात्र केवळ कामगारांवर ठपका ठेवला जातो. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी, असा सूर आहे.
आचारसंहिता भंगाची तक्रार
निवडणूक आचारसंहिता काळात बदली आणि बढतीचा लाभ दिला जाऊ शकतो काय, असे पत्र जिल्हा निवडणूक विभागाला पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांनी याची दखल घ्यावी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली असल्याची माहिती आहे.


Web Title: Workers' fasting session in ST
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.