भूमिगत गटारांची कामे रखडली
By Admin | Updated: June 22, 2014 00:14 IST2014-06-22T00:14:34+5:302014-06-22T00:14:34+5:30
नगरपरिषद अंतर्गत विविध प्रभागात मंजूर झालेली भूमिगत गटाराची कामे सहा महिन्यापासून रखडली आहे़ त्यामुळे पावसाळ्यात जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे़

भूमिगत गटारांची कामे रखडली
वणी : नगरपरिषद अंतर्गत विविध प्रभागात मंजूर झालेली भूमिगत गटाराची कामे सहा महिन्यापासून रखडली आहे़ त्यामुळे पावसाळ्यात जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे़
नगरपरिषदेने सहा महिन्यांपूर्वी शहरातील विविध प्रभागात ७० लाख रूपयांची भूमिगत गटारांची कामे मंजूर केली़ त्या कामाच्या निविदाही काढण्यात आल्या. निविदा स्विकृत करून कंत्राटदारांना कामाचे आदेशही देण्यात आले़ मात्र कंत्राटदारांकडून कामे सुरू करण्यास सतत चालढकल केली जात आहे़ काही मोजकी कामे सुरू केली, तर काही कामे अर्धवट ठेवण्यात आली आहे़ घरासमोर मोठ्या नाल्या खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना घरात प्रवेश करणे त्रासाचे झाले आहे़ खोदलेल्या नाल्यांमध्ये लहान मुले पडल्याच्या घटनाही घडत आहे़ अनेक ठिकाणच्या कामांना अद्याप सुरूवातही करण्यात आली नाही़
मजूर व कारागीर नसल्याचे कारण कंत्राटदारांकडून सांगण्यात येत आहे़ काही ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे आढळून आल्याने काम करण्यास अडथळा येत आहे़ मात्र नगरपरिषद अतिक्रमण हटविण्यास मागेपुुढे पाहत आहे़ आता पावसाळा तोंडावर आला आहे़ नाल्या नसल्याने पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहणार आहे़ काही ठिकाणी पाणी साचून परिसरात रोगराई पसरण्याची भिती व्यक्त होत आहे़ शहरात काही वर्षांपूर्वी भूमिगत गटारांचा प्रयोग राबविण्यात आला होता़ तो अपयशी ठरल्यानंतर पुन्हा नव्याने या प्रयोग राबविण्यात येत आहे़ मात्र त्यातही विघ्न येत असल्याने ही योजना रखडली आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)