‘जन-धन’मध्ये निव्वळ खाते उघडण्याचेच काम
By Admin | Updated: January 24, 2015 23:03 IST2015-01-24T23:03:01+5:302015-01-24T23:03:01+5:30
केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी ‘पंतप्रधान जन-धन’ योजनेचे निव्वळ खाते उघडण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश खात्यावरून कुठलेही व्यवहार होताना दिसत नाही.

‘जन-धन’मध्ये निव्वळ खाते उघडण्याचेच काम
अखिलेश अग्रवाल - पुसद
केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी ‘पंतप्रधान जन-धन’ योजनेचे निव्वळ खाते उघडण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश खात्यावरून कुठलेही व्यवहार होताना दिसत नाही. खाते उघडल्यानंतर ४५ दिवसापर्यंत व्यवहार न केल्यास विमा योजनेचा व इतर लाभ मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केलेले आहे. याबाबत नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याचे समोर आले आहे.
जन-धन योजनेतील खातेदाराचा अकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या परिवारातील एक लाख रुपयांची विमा रक्कम देण्यात येणार असल्याचे बँकांना शासनाने कळविले आहे. इतर सुविधाही देण्यात येणार आहेत. केंद्राने ज्या उद्देशाने ही योजना सुरू केली. तो उद्देश अजूनही सफल होत नसल्याचे चित्र आहे. त्यापुढे केंद्राच्या उद्देशाप्रमाणे पैसा चालनात आलेला नाही. झिरो बॅलन्सची खाती अधिक असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याचा गैरफायदा घेत काहींनी खाते उघडण्यासाठी प्रती व्यक्ती ५० रुपये आकारणीही सुरू केल्याचे समोर आले आहे. केंद्र शासनाने जन-धन योजनेचा प्रचार, प्रचार केल्याने प्रत्येक नागरिकाला आपले खाते बँकेत असावे असे वाटत आहे. मात्र कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत सहजपणे जन-धन योजनेचे खाते उघडता येत नाही. याचा पुसद शहरात अनेकांना प्रत्यय आला आहे.
जन-धन योजने अंतर्गत खाते उघडणाऱ्या ग्राहकाला एक लाखाचा अपघात विम्याचे कवच देण्यात आले आहे. मात्र हा निधी कसा दिला जाईल याविषयी बँकादेखील अनभिज्ञ आहेत. याव्यतिरिक्त नागरिकांमध्ये या योजनेविषयी वेगवेगळे गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे योजनेचा उद्देश नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जिल्ह्यात विविध बँकामध्ये लाखो ग्राहकांनी जन-धन योजनेत खाते उघडले. त्यापैकी निम्म्याहून अधिक ग्राहकांनी खात्यावर व्यवहार केला नसल्याचे पुढे आले.