‘पेयजल’ची कामे रखडली
By Admin | Updated: August 10, 2016 01:05 IST2016-08-10T01:05:51+5:302016-08-10T01:05:51+5:30
जिल्हा परिषदेमार्फत ४६ गावांमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे अत्यंत संथगतीने होत असल्याने ...

‘पेयजल’ची कामे रखडली
४६ गावे : १० योजना पूर्ण करणे प्रशासनाला अशक्यच
यवतमाळ : जिल्हा परिषदेमार्फत ४६ गावांमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे अत्यंत संथगतीने होत असल्याने पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात तरी संबंधित गावांतील ग्रामस्थांना पाणी मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जिल्ह्यातील ४६ गावांमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे सुरू आहे. यंत्रणेच्या कासवगतीने या योजना अद्याप पूर्ण होऊ शकल्या नाहीत. यापैकी सध्या ३६ योजनांची कामे प्रथगतीपथावर असल्याचे सांगितले जाते. उर्वरित १० गावांमधील योजना कोणत्याही स्थितीत पूर्णत्वास जाण्याची शक्यता नाही, असे खुद्द जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे यांनीच स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे येत्या सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले आहे. तथापि हा अल्टिमेटमही यंत्रणा मनावर घेण्याची शक्यता कमीच दिसत आहे. शिरपूर पॅटर्नप्रमाणे जिल्ह्यात यवतमाळ पॅटर्न राबविण्यात येत आहे. यात १३१ ठिकाणी विहीर पुर्नभरण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. मात्र त्यापैकी ८१ ठिकाणीच हा पॅटर्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. परिणामी या महत्त्वाकांक्षी पॅटर्नची नव्याने मांडणी करावी लागणार आहे.
याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाच हजार ११२ विहिरींची कामे पूर्ण झाल्याचेही सांगण्यात येते. सात हजार ३८७ विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. विदर्भ धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत दोन हजार २१३ विहिरी प्रस्तावित आहे. (शहर प्रतिनिधी)
सोलर पंप ठरले कुचकामी
मारेगाव तालुक्यातील इंदिरानगर-धरमपोड येथील सोलर पंप गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. या पंप दुरूस्तीसाठी पुणे येथील संबंधित तांत्रिक कर्मचाऱ्याशी संपर्क करावा लागतो. मात्र संपर्क करूनही ते येत नाहीत. त्यामुळे एवढ्या दूरच्या एंजसीला कंत्राट देण्याचे कारणच काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांनी सोलर पंप कुचकामी असल्यास ते घेण्याचा कोणताही लाभ नसून याबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.