सोनखास येथील पुलाचे काम संथगतीने
By Admin | Updated: June 15, 2015 02:36 IST2015-06-15T02:36:28+5:302015-06-15T02:36:28+5:30
अत्यंत वर्दळीच्या येथील सोनखास पुलाचे काम संथगतीने सुरू आहे.

सोनखास येथील पुलाचे काम संथगतीने
पारवा : अत्यंत वर्दळीच्या येथील सोनखास पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रामुख्याने सोनखास येथील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
पारवालगतच्या सोनखास गावातील नागरिकांसाठी सदर पूल महत्त्वाचा आहे. या गावातील नागरिकांना पारवा येथे येण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. बँक, शाळा, बाजारपेठ आदी कामांसाठी सदर गावातील नागरिकांना याच मार्गावरून पारवा येथे यावे लागते. त्यामुळेच तीन-चार महिन्यांपूर्वी या पुलाचे काम हाती घेण्यात आले. सद्यस्थितीत पिल्लर उभे झाले असून काही भागावर स्लॅबही टाकण्यात आलेला आहे. मात्र जवळपास २० फुटांच्या स्लॅबचे काम संथगतीने सुरू आहे.
स्लॅब टाकण्यासाठी गजाची बांधणी करून ठेवण्यात आली. मात्र त्यावर स्लॅब टाकण्यासाठीचे काम थांबले असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी सदर काम पूर्ण न झाल्यास सोनखास येथे जाण्यासाठीचा आणि तेथून पारवा येथे येण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. मोटरसायकल आणि इतर प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णत: थांबणार आहे. केवळ नागरिकांना पाण्यातून पायदळ मार्ग काढावा लागणार आहे. या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी आहे. पावसाळा तोंडावर आला असल्याने सदर कामाला गती देण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)