जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांचा सत्याग्रह
By Admin | Updated: January 29, 2015 23:15 IST2015-01-29T23:15:46+5:302015-01-29T23:15:46+5:30
जिल्ह्याला लागून असलेल्या वर्धा आणि काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर येथे शासनाने दारूबंदी जाहीर केली. आता यवतमाळ जिल्हाही दारूमुक्त करावा, यासाठी महिला संघटना पुढे येत आहेत.

जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांचा सत्याग्रह
यवतमाळ : जिल्ह्याला लागून असलेल्या वर्धा आणि काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर येथे शासनाने दारूबंदी जाहीर केली. आता यवतमाळ जिल्हाही दारूमुक्त करावा, यासाठी महिला संघटना पुढे येत आहेत. २६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील गावोगावी झालेल्या ग्रामसभेत महिलांनी पुढाकार घेत, जिल्ह्यातही दारूबंदी करा, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
प्रमुख युतीचे पक्ष भाजप व सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दारूबंदीच्या मागणीला पाठींबा दिला असुन ३० जानेवारीला महात्मा गांधीजीच्या पुण्यतिथीला विदर्भ जनांदोलन समिती कार्यकर्ते व महिला बचत गटांतर्फे सदोबा सावळी येथे जनता विकास आघाडीचे प्रमुख व सामाजिक नेते मुबारक तवर यांच्यासह आदिवासी महिला तसेच शेकडो गावात व कोलम पोडांवर उपोषण सत्ताग्रह होणार आहे.
राज्यशासनाने चंद्रपूर सोबतच यवतमाळ जिल्यात दारूबंदी करावी अशी मागणी आदिवासी महीला संघर्ष समितीच्या लताबाई आडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे . सरकारने
जिल्ह्यातील सुमारे १ हजार २०० ग्रामसभेच्या दारूबंदीच्या ठरावाची दखल घेत जिल्ह्यात दारूबंदी लागू करावी.
अनेक गावात खुलेआम दारू विकली जाते. मात्र, पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने संपूर्ण गाव दारूमुळे अधोगतीला गेले आहे. दारूसोबतच जुगाराचे व्यसनही वाढले आहे. यावर अंकूश नसल्याने आमची तरुण मुले कामधंदा करत नाहीत, दारू पिऊन घरी येतात. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता, केळकर समितीने यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करा, असा अहवाल दिला आहे. विदर्भ जन आंदोलन समितीनेही या अहवाला प्रमाणे जिल्हा दारूमुक्त करा अशी मागणी केली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, भाजपचे नेते, भाजपच्या महिला आघाडीनेही यापूर्वी दारूच्या विरोधात रान उठवले होते. आता हेच नेते सत्तेत आल्याने त्यांनी सत्तेचा उपयोग करून यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी, अशी मागणी होत आहे. दारूबंदीची चळवळ सरकारला गंभीरपणे घ्यावी लागेल असा इशारा यावेळी किशोर तिवारी यांनी दिला आहे . (कार्यालय प्रतिनिधी)