उमरखेडमध्ये महिला सुरक्षा जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:33 IST2018-01-06T23:33:07+5:302018-01-06T23:33:18+5:30
येथील पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरातून महिला सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थिनींसह पोलीस बँड पथकाने सहभाग घेतला.

उमरखेडमध्ये महिला सुरक्षा जनजागृती रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : येथील पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरातून महिला सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थिनींसह पोलीस बँड पथकाने सहभाग घेतला.
पोलीस स्टेशनतर्फे आयोजित या रॅलीत विद्यार्थिनींनी नऊवारी पातळ व डोक्याला फेटे बांधून सहभाग नोंदविला. डफडीच्या तालावर काही विद्यार्थिनींनी लेझिम नृत्य सादर केले. स्त्री भ्रूणहत्त्या करू नका, बेटी बचाव बेटी जगाव आदींची फलके विद्यार्थिनींनी दर्शविली. विद्यार्थिनींनी महिला सुरक्षा जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
या रॅलीत जिल्हा पोलिसांचे बँड पथक सहभागी झाले होते. त्यांनी ‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र पे्रषिकांचे’, ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ आदी देशभक्तिपर गीते सादर केली. प्रा.अनिल काळबांडे व नंदा गायकवाड यांनी महिला सुरक्षा जनजागृतीपर गीते सादर केली.
शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर पोलीस ठाण्यात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी अॅड.पूजा संस्थानिके यांनी महिला विषयक कायद्यांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. अॅड.कलंत्री, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ.वंदना कदम, सरोज देशमुख, नगरसेविका कविता मारोडकर, सत्यनिर्मिती महिला मंडळाच्या शबाना खान, राखी मगरे, सीमा खंदारे, अनुसया महिला भजनी मंडळ, प्रा.निलोफर पठाण, रेखा भुते, अरुणा राठोड, वंदना पवार आदींसह महिला विद्यार्थिनी उपस्थित होत्या. संचालन ठाणेदार हनुमंतराव गायकवाड यांनी केले. आभार अलका मुडे यांनी मानले.