पाणीटंचाई : देखभालीअभावी हातपंप बंद, महिलांची पाण्यासाठी भटकंतीसोनखास : उन्हाळ्याला अजून बराच कालावधी शिल्लक असताना जिल्ह्यातील असंख्य गावांमध्ये पाणीटंचाईचे चटके बसणे सुरू झाले आहे. नजीकच्या लासीना टेकडी येथे तीव्र पाणीटंचाई असून या बाबत अनेकदा पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने अखेरीस गावातील महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.लासीना टेकडी या गावात चार हातपंप आहे. या हातपंपावरूनच सर्व नागरिक पाणी भरतात. गेल्या काही महिन्यांपासून योग्य देखभालीअभावी हे हातपंप बंद पडले आहे. या बाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही लक्ष देण्यात आले नाही. गावाला लागून असलेल्या एका शेतात दोन बोअर आहे. त्यांनी पंप सुरू केल्यावर गावातील हातपंपांना पाणीच येत नाही. या बाबत वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्यामुळे अखेरीस महिलांना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक द्यावी लागली. यावेळी महिलांनी त्वरित पाण्याची सोय करून देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देताना शकुंतला कुंभेकर, वंदना कुंभेकर, सुनीता येलके, जयंताबाई दाभेकर, शालिनी येलके, संगीता जवळकर, सखूबाई राठोड, बेबीबाई चोपडे, जयवंता शिवणकर, कौसल्या जाधव, सावित्री वाघाडे, मंदा पवार, मीरा राठोड, ललिता वाघाडे, नंदा वाघाडे, कलाबाई कुंभेकर, कमला राठोड, सुमित्रा जाधव, शंकर वाघाडे, भगवान कुंभेकर, विमल गादेकर, वनिता वाघाडे, वच्छला पवार, सुबद्रा राऊत, कासीबाई रामगडे आदींसह शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
महिलांची जिल्हा कचेरीवर धडक
By admin | Updated: December 23, 2014 23:13 IST