दारू दुकानाविरुद्ध महिलांचा एल्गार
By Admin | Updated: December 16, 2014 23:02 IST2014-12-16T23:02:30+5:302014-12-16T23:02:30+5:30
आर्णी शहरातील महिलांनी देशी दारू दुकानांविरोधात आवाज उठवित जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी धडक दिली. यावेळी महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

दारू दुकानाविरुद्ध महिलांचा एल्गार
मध्यवस्तीत दारूविक्री : आर्णीच्या महिला जिल्हा कचेरीवर धडकल्या
यवतमाळ : आर्णी शहरातील महिलांनी देशी दारू दुकानांविरोधात आवाज उठवित जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी धडक दिली. यावेळी महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
सध्या स्थितीत आर्णी शहरात देशी दारूंची १४ दुकाने आहेत. असे असतानाही प्रभाग तीन मधील मध्यवस्तीत देशी दारूचे पुन्हा एक नवीन दुकान थाटण्यात आले. यामुळे या भागातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. महिलांना काम करणे कठीण झाले आहे. भाजीमंडी, दवाखाना, हॉटेल, कापडदुकान, मेडीकल अशा ठिकाणी नोकरी करणेसुद्धा अवघड झाले आहे. परिसरातून ये-जा करताना दारुड्यांचा मोठा जाच सहन करावा लागतो. यामुळे हे दुकान हटविण्याची मागणी महिलांनी केली आहे. यासंबंधिचे निवेदन दारूबंदी व राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच याबाबत त्वरित दखल घेण्यात येऊन योग्य कारवाई न करण्यात आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या महिलांनी यावेळ दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या मागण्यांसाठी धडक देणाऱ्या महिलांमध्ये गीता सनसेटवार, कांता कोडपकवार, चंदा ढाले, संध्या ढोले, लता कोरेवाड, बेबी तडसे, शांता भस्मे, शकुंतला आरणकर, रेखा वाकोडे आदींसह आर्णी येथील असंख्य महिलांचा समावेश होता. (शहर वार्ताहर)