महिला सरपंचांना मोफत एसटी प्रवास घोषणा हवेत
By Admin | Updated: October 1, 2015 02:29 IST2015-10-01T02:29:28+5:302015-10-01T02:29:28+5:30
महिलांसाठी आरक्षण जाहीर करून सरकारने महिलांना राजकारणात संधी उपलब्ध करून दिली. मात्र त्यांना मिळणाऱ्या विविध सोयी-सुविधांची अद्यापही माहिती दिली नाही.

महिला सरपंचांना मोफत एसटी प्रवास घोषणा हवेत
माहितीचा अभाव : दिग्रसमध्ये लाभच नाही
दिग्रस : महिलांसाठी आरक्षण जाहीर करून सरकारने महिलांना राजकारणात संधी उपलब्ध करून दिली. मात्र त्यांना मिळणाऱ्या विविध सोयी-सुविधांची अद्यापही माहिती दिली नाही. त्यामुळेच अनेक योजनांपासून महिला पदाधिकारी वंचित आहे. दोन वर्षांपूर्वी महिला सरपंचांना मोफत एसटी प्रवास ही घोषणा करण्यात आली होती. परंतु अद्यापही ही योजना कागदावरच दिसत आहे.
दिग्रस तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींमध्ये २६ च्यावर महिला सरपंच आहे. त्यांना अद्यापही या योजनेचा फायदा झाला नाही, तर कित्येकांना या योजनेची माहितीसुद्धा नाही. सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारताना अत्यावश्यक सुविधांसाठी महिला सरपंचांना स्वत:चे पैसे खर्च करावे लागते. आर्थिक फटका बसू नये म्हणून दोन वर्षांपूर्वी ही घोषणा करण्यात आली. त्यासाठी अर्थसंकल्पात सहा कोटी रुपयांची तरतूदही केली होती. महिला सरपंचांना पंचायत समितीत प्रशिक्षण, विविध बैठका, गावविकासांच्या कामांचा आढावा, आरोग्य मेळावे आदी कामांसाठी तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार जावे लागते. त्यामुळे ही सुविधा महिला सरपंचांसाठी फायद्याची आहे.
सरकार अनेक माध्यमातून महिलांच्या सबलीकरणाचे प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अनेक योजना आखल्याचे दाखविले जाते. परंतु आखल्या गेलेल्या योजना फक्त कागदावरच राहतात. त्याची अंमलबजावणी होत नाही.
(शहर प्रतिनिधी)