प्रकृती गंभीर : कळंबमध्ये नेमणूक, वसाहत यवतमाळची यवतमाळ : डास मारण्याचे विषारी औषध प्राशन करून एक महिला पोलीस शिपाई चक्क ठाण्यात पोहोचली. तोंडातून फेस येऊन ती ठाण्याच्या आवारात कोसळली. हा प्रकार पाहून ठाण्यातील सर्वांचीच तारांबळ उडाली. तत्काळ यवतमाळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. कळंब पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर महिला शिपायाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. प्रिया (२४) रा. यवतमाळ, असे महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वसाहतीत आपल्या क्वॉर्टरमध्ये तिने विष प्राशन केले. त्यानंतर ती यवतमाळवरून थेट नियुक्तीच्या कळंब पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे तिच्या तोंडातून फेस येऊन ठाण्याच्या आवारातच कोसळली. नेमका काय प्रकार आहे हे कोणाच्याच लक्षात आले नाही. ठाण्यातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने एका वाहनातून यवतमाळातील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. प्रिया काही वर्षापूर्वीच पोलीस दलात दाखल झाली. तिचा कामातील अनुभव कमी आहे, त्यामुळे तिच्या हातून नेहमी चुका होत होत्या. याच कारणावरून प्रियाचा कसुरी रिपोर्ट कळंब ठाण्यातून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात प्रियाला नोटीस बजावून पाच हजार रुपयांचा दंड का आकारण्यात येऊ नये, असा खुलासा मागविण्यात आल्याची माहिती आहे. याच दडपणातून तिने विष प्राशन केल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. प्रकृती गंभीर असल्याने अद्यापपर्यंत पोलिसांना प्रियाचे बयान घेता आलेले नाही. या घटनेसाठी नेमके कोणते घटक कारणीभूत आहेत, याचा शोध घेण्यात येणार आहे. याप्रकरणी शहर ठाण्यात कोणतीच नोंद घेण्यात आलेली नाही. विष घेतल्याच्या प्रकाराबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कळंबचे ठाणेदार बी.जी. कऱ्हाळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, असता त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. (कार्यालय प्रतिनिधी) विनयभंगाच्या आरोपात पोलीस शिपायाला अटक यवतमाळ : जिल्हा पोलीस मुख्यालयातील चार्ली पथकात कार्यरत पोलीस शिपायाने एका विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सदर शिपायाला रात्रीच अटक करून गुन्हा दाखल केला. अजय किसन शेंडे रा. रेणुका मंगलम भोसा रोड, यवतमाळ असे अटकेत असलेल्या पोलिसाचे नाव आहे. तो वाघापूर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेचा पाठलाग करून त्रास देत होता. या प्रकाराची तक्रार सदर महिलेने सोमवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यात अजयने सोमवारी रात्री संदीप मंगल परिसरात तिचा विनयभंग केल्याचे म्हटले आहे. त्यावरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला लगेच अटक केली. मंगळवारी न्यायालयाने अजयची जामिनावर सुटका केली आहे. मात्र त्याच्या या कृत्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव तयार करण्याची पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सुरू करण्यात आली होती.
विष पिऊन महिला पोलीस शिपाई पोहोचली ठाण्यात
By admin | Updated: March 2, 2016 02:42 IST