काँग्रेसच्या महिला नेत्यांना पडला मदतीचा विसर

By Admin | Updated: October 30, 2015 02:17 IST2015-10-30T02:17:41+5:302015-10-30T02:17:41+5:30

तिवसाच्या आमदाराची चार महिन्यांपासून प्रतीक्षा : पिंपरी बुटीतील शेतकऱ्याच्या दोन मुलींच्या संगोपनाची स्वीकारली होती जबाबदारी

The women leaders of the Congress fell in love | काँग्रेसच्या महिला नेत्यांना पडला मदतीचा विसर

काँग्रेसच्या महिला नेत्यांना पडला मदतीचा विसर

तिवसाच्या आमदाराची चार महिन्यांपासून प्रतीक्षा : पिंपरी बुटीतील शेतकऱ्याच्या दोन मुलींच्या संगोपनाची स्वीकारली होती जबाबदारी
हमीद खॉ पठाण अकोलाबाजार
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे सांत्वन करून त्या कुटुंबातील दोन मुलींच्या शिक्षणासह संगोपणाची जबाबदारी घेणाऱ्या काँग्रेसच्या आमदारासह महिला पदाधिकाऱ्यांना मदतीचा विसर पडल्याचे दिसत आहे. चार महिने झाले तरी अद्यापपर्यंत या दोन मुलींना मदत तर मिळालीच नाही, काँग्रेसचा कुणी कार्यकर्ताही पिंप्रीबुटी येथे साध्या चौकशीसाठी आला नाही.
कर्जाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी यवतमाळ तालुक्यातील पिंप्रीबुटी ते अकोला अशी पदायात्रा २७ जून रोजी काँगे्रसच्यावतीने काढण्यात आली होती. यावेळी काँग्रेस पक्षाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात देऊन येथील दोन मुलींना दत्तक घेत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, विधानसभा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, हिंगोलीचे खासदार राजीव सातव, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते. शेतकरी रुपेश रामचंद्र काळे यांच्या मोनीका व रुपाली या दोन मुलींना आमदार यशोमती ठाकुर व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी दत्तक घेत शिक्षणासह संगोपणाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच आश्वासन त्यांनी नेत्यांच्या उपस्थितीत दिले होते.
परंतु आता चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही अद्यापपर्यंत कोणतीही मदत दिली नाही. आमदार यशोमती ठाकुर, संध्याताई सव्वालाखे यांनी मदत तर दूरच पाल्यांच्या परिस्थितीची साधी चौकशीही केली नाही. त्यांनी जाहीर केलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला असावा किंवा प्रसिद्धीसाठी त्यांनी आश्वासन दिले असावे असा सूर नागरिकांतून निघत आहे.
रुपेश काळे या शेतकऱ्याने ७ आॅक्टोबर २०१० रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याच्याकडे तीन एकर शेती आहे. त्याच्या आत्महत्येनंतर दोन चिमुकल्यांना आजीकडे सोपवून त्याची पत्नी माहेरी निघून गेली. आता या दोन मुलींचे संगोपण आजी करीत आहे. मोनिका ही तिसऱ्या वर्गात तर रुपाली पहिल्या वर्गात गावातील शाळेत शिकत आहे. काही दिवसांपूर्वी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी गावात येऊन या दोन मुलींना शालेय साहित्य देऊन मदत केली होती. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी भर सभेत दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण झाले नाही.
या संदर्भात संध्याताई सव्वालाखे यांच्याशी संपर्क साधला असता, लवकरच या दोघींना मदत दिली जाईल. कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांच्या नावावर ठराविक रक्कम फिक्स केली जाईल. नगरपंचायतीची निवडणूक संपताच आमदार यशोमती ठाकुर यांच्यासोबत पिंप्रीला जाऊन त्या कुटुंबाची भेट घेणार असल्याचे सांगितले.

Web Title: The women leaders of the Congress fell in love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.