२१ गावांतील महिला जिल्हा कचेरीवर
By Admin | Updated: February 2, 2015 23:14 IST2015-02-02T23:14:08+5:302015-02-02T23:14:08+5:30
कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथील सेंट्रल बँकेची शाखा तालुका मुख्यालयी पळविण्यात आली. थेट अनुदान योजना आणि बचत गट याच बँकेशी संलग्न आहेत. मात्र गावातील बँक

२१ गावांतील महिला जिल्हा कचेरीवर
बँक पळविण्याला विरोध : दारुबंदी, अवैध धंद्यांना विरोध
यवतमाळ : कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथील सेंट्रल बँकेची शाखा तालुका मुख्यालयी पळविण्यात आली. थेट अनुदान योजना आणि बचत गट याच बँकेशी संलग्न आहेत. मात्र गावातील बँक ४० किलोमीटरवर गेल्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बँकेची शाखा पूर्ववत डोंगरखर्डा येथेच आणावी यासाठी परिसरातील तब्बल २१ गावांतील नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर घडक दिली.
कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे सेंट्रल बँक आॅफ इंडियाची शाखा काही वर्षापूर्वी स्थापन करण्यात आली होती. या बँकेच्या कार्यक्षेत्रात परिसरातील २१ गाव येतात. मात्र कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने ही शाखा अवघड होती. यामुळे शाखा कळंबला स्थानांतरीत करण्यात आली. तेव्हापासून २१ गावातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
बचतगट, विद्यार्थी शिष्यवृत्ती, निराधार, पीक कर्ज यासह सर्व कामासाठी कळंब गाठावे लागते. यातच संपूर्ण दिवस जातो. यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला आहे. आर्थिक नुकसानही होत आहे. ही शाखा पूर्ववत गावात देण्याची मागणी महिला बचत गटांच्या महिलासंह ग्रामस्थांनी केली आहे.
डोंगरखर्डासह लगतच्या २१ गावामध्ये दारू आणि अवैद्य धंद्याना उत आला आहे. यामुळे गावाची शांतता भंग झाली आहे. व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले आहे. यावर मात करण्यासाठी दारूबंदीसह डोंगरखर्डा येथे पोलीस चौकी देण्याची मागणी केली आहे. यावेळी डोंगरखर्डा, अंतरगाव, मुसळ, रूढा, खोरद, कुसळ, कोडपाखिंडी, निमगव्हाण, मजरा, तिधरी, पिंपळशेंडा, झाडकिन्ही, किनवट, मेटीखेडा, पालोती, पहूर, मारकंडा, किन्हाळा, नांझा आणि पोटगव्हाण येथील महिला आणि ग्रामस्थांनी यावेळी हजेरी लावली होती. यावेळी सरपंच सविता शेंदे्र, जावेद शेख, रवी गेडाम, सुमय्या आदिल खाँ पठान, प्रफुल्ललता पवार, अंतकला मोरे, निर्मला शिवरकर आदी उपस्थित होत्या. (शहर वार्ताहर)