सूरजनगरमध्ये महिलेचा खून
By Admin | Updated: May 29, 2017 00:24 IST2017-05-29T00:24:34+5:302017-05-29T00:24:34+5:30
येथील सूरजनगरमध्ये महिलेचा खून झाल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. सदर महिलेच्या

सूरजनगरमध्ये महिलेचा खून
चोरीचा बनाव : रात्रीची घटना, रविवारी दुपारी आली उघडकीस
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील सूरजनगरमध्ये महिलेचा खून झाल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. सदर महिलेच्या डोक्यावर प्रहार करून खून करण्यात आला. नंतर घरातील दोन कपाट उघडून साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आले. या खुनाला चोरीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आरोपींकडून झाल्याचे यावरून दिसून येत आहे.
पपिता निलध्वज कांबळे (३३) रा. सूरजनगर, असे मृत महिलेचे नाव आहे. पपिता कांबळे यांचे पती निलध्वज हे आदर्श विद्यालय डोंगरखर्डा येथे शिक्षक आहेत. दोन दिवसांपूर्वी ते मुलासह नागपूर येथे लग्नासाठी गेले होते. दरम्यान पपिता घरी एकट्याच होत्या. रविवारी दुपारी पपिताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ््यात पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून त्यांनी घटनास्थळ गाठले असता, पपिताचा बेडरूममध्ये डोक्यावर जोरदार प्रहार करून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. हा खून शनिवारी रात्री किंवा त्यापूर्वी झाला असावा, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी भेट दिली. विविध पथकातील कर्मचारी व वडगाव रोडचे नवनियुक्त ठाणेदार बाळासाहेब खाडे घटनास्थळावर उपस्थित होते. ठसे तज्ज्ञ आणि न्यायवैद्यक विभागाची मोबाईल व्हॅनही येथे दाखल झाली.
कांबळे यांच्या घराचा पुढचा दरवाजा उघडा होता. यावरून ही घटना चोरीसाठी झालेली नसावी, असा अंदाज लावला जात आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ दोन मोबाईल पडून होते. पपिता या निलध्वज यांची दुसरी पत्नी आहे. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा व पपितापासून दुसरा मुलगा आहे. निलध्वज मुलाला घेऊन नागपूर येथे लग्नाला गेल्यानंतर ही घटना घडली. नेमका खून कशातून झाला याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे.
ठाणेदार रूजू होताच तपासाचे आव्हान
वडगाव रोड पोलीस ठाण्याला काही आठवड्यापासून नियमित ठाणेदार नव्हते. रविवारी दुपारीच बाळासाहेब खाडे पदभार स्विकारण्यासाठी आले असता त्यांना थेट खुनाच्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी जावे लागले. नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासूनच खुनाच्या तपासाने ठाणेदार खाडे यांच्या कामाची सुरूवात झाली.