कळंबमध्ये गर्भपात करताना युवती दगावली
By Admin | Updated: June 19, 2016 02:16 IST2016-06-19T02:16:16+5:302016-06-19T02:16:16+5:30
गर्भपात करताना झालेल्या अतिरक्तस्रावामुळे युवती दगावली तर प्रियकर युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

कळंबमध्ये गर्भपात करताना युवती दगावली
प्रियकराची आत्महत्या : डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध पोलिसात तक्रार
कळंब : गर्भपात करताना झालेल्या अतिरक्तस्रावामुळे युवती दगावली तर प्रियकर युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे कळंब तालुक्यात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. रंजना मधुकर मेश्राम (१८) बोरीमहल व दुर्वेश दादाराव बठे (२०) रा. रासा अशी मृतांची नावे आहे. दरम्यान, येथील एका डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
दुर्वेश हा रासा येथे जावई विलास नागोराव मस्कर यांच्याकडे मागील दहा-बारा वर्षांपासून वास्तव्याला होता. दरम्यान, त्याचे बोरीमहल येथील रंजना मेश्राम या युवतीसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यांचे संंबंध आल्याने रंजनाला गर्भधारणा झाली. ही बाब लक्षात येताच दुर्वेशने रंजनाचा गर्भपात करण्याचे ठरविले. दोघेही मंगळवारी येथील तुंडलवार रुग्णालयात पोहोचले. या ठिकाणी रंजनावर गर्भपातासाठी उपचार करण्यात आले. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने तिला यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला डॉ.ज्योती तुंडलवार व डॉ. मोहन तुंडलवार यांनी दिला.
डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार रंजनाला यवतमाळ येथे हलविण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र बदनामीच्या भीतीने तो पूर्णपणे खचला. याच कारणावरून त्याने बुधवारी बोरीमहल ते रासा मार्गावर असलेल्या मांडवकर यांच्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. इकडे रंजना मृत्यूशी झुंज देत होती. शनिवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.
तुंडलवार डॉक्टर दाम्पत्यांनी बेकायदेशीररीत्या केलेला गर्भपात आणि त्यात दाखविलेला निष्काळजीपणा यामुळे रंजनाचा मृत्यू झाल्याची तक्रार तिचे वडील मधुकर उदेभान मेश्राम यांनी पोलिसात दिली. प्रकृती गंभीर झाल्याने या डॉक्टरांंनीच तिला यवतमाळ येथे दाखल केले, असे मेश्राम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. उशिरापर्यंत या प्रकरणी कारवाई सुरू होती. (तालुका प्रतिनिधी)