रूग्णवाहिका ट्रेलरला धडकून महिला ठार, दोन जखमी
By Admin | Updated: March 8, 2017 00:24 IST2017-03-08T00:24:18+5:302017-03-08T00:24:18+5:30
स्वत:च्या रूग्णवाहिकेने आई व वडीलांना नागपुरातील खासगी रूग्णालयात तपासणी करून परत जात होते.

रूग्णवाहिका ट्रेलरला धडकून महिला ठार, दोन जखमी
रस्त्यावर उभा नादुरूस्त ट्रेलर ठरला काळ : वाहन वणीचे, अपघात पिंपळगावात
वणी : स्वत:च्या रूग्णवाहिकेने आई व वडीलांना नागपुरातील खासगी रूग्णालयात तपासणी करून परत जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला नादुरूस्त असलेल्या ट्रेलरच्या बाजुला लावण्यात आलेल्या दगडाला रूग्णवाहिकेने धडक दिली. त्यात रूग्णवाहिका पलटी झाल्याने रूग्णवाहिकेतील महिला जागीच मृत पावली, तर चालक व त्याचे वडील गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावरील वरोरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंपळगाव गावानजिक सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडला.
येथील वासेकर ले-आऊटमधील रहिवासी रवींद्र धर्मराव कांबळे हे आपल्या स्वत:च्या एम.एच.२९-टी.३९१८ या क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने आई व वडिलांना घेवून वैद्यकीय तपासणी करण्याकरिता नागपुरला गेले होते. खासगी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तपासणी पूर्ण झाल्यानंतर रूग्णवाहिकेने नागपूरवरून वणीकडे परत जात असताना नागपूर-चंद्रपूर मार्गावरील पिंपळगाव फाट्यानजीक एम.एच.४३-क्यु.९४५८ या क्रमांकाचा ट्रेलर नादुरूस्त असल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. ट्रेलरला कुठलीही लाईट लावले नव्हते, तर त्याच बाजुने दगड ठेवण्यात आले होते. य दगडाला रूग्णवाहिका धडकून पलटी झाली. त्यात रूग्णवाहिकेतील लिलाबाई धर्मराव कांबळे (६५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर रवींद्र धर्मराव कांबळे व धर्मराव कांबळे गंभीररित्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. वरोरा पोलिसांनी ट्रेलर मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.(कार्यालय प्रतिनिधी)