परवान्याशिवाय दुचाकी सुसाट
By Admin | Updated: February 16, 2016 03:46 IST2016-02-16T03:46:27+5:302016-02-16T03:46:27+5:30
सध्या हेल्मेट सक्तीने वाहनधारक हादरल्यागत दिसत आहे. परंतु हेल्मेट सोडा अनेकांकडे साधा वाहन चालविण्याचा

परवान्याशिवाय दुचाकी सुसाट
पुसद : सध्या हेल्मेट सक्तीने वाहनधारक हादरल्यागत दिसत आहे. परंतु हेल्मेट सोडा अनेकांकडे साधा वाहन चालविण्याचा परवानाही दिसत नाही. विना परवाना सर्रास वाहने चालवून अपघाताला आमंत्रण दिले जात आहे. हेल्मेट सक्तीसोबतच परवान्याचीही सक्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुसद शहरात ३० वर्षापूर्वी काही मोजक्या लोकांकडे दुचाकी वाहन होते. आज शहराच्या लोकसंख्येचे २५ टक्के वाहनधारक आहेत. त्यातही दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. बहुतांश घरी दोन ते चार दुचाकी वाहने दिसून येतात. परंतु त्या घरातील एखाद्याच व्यक्तीकडे परवाना असतो. पुसद शहरातील सुमारे ५० टक्के नागरिकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याची माहिती आहे. अलिकडे तर शाळकरी मुलेही भरधाव दुचाकी चालविताना दिसून येतात. १४ ते १६ वयोगटातील ही मुले नियमांना तिलांजली देत वाहन चालवीत असतात. कोणत्याही शाळा महाविद्यालयासमोर शिकवणी वर्गासमोर उभे राहिल्यास अशा दुचाकी चालक मुलांची संख्या अधिक दिसून येते. त्यांना परवाना विचारला तर ते थेट नाही म्हणून सांगतात.
वाहनधारकांकडे परवाना आहे की नाही, याची तपासणी कधीही होत नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास वाहतूक पोलीस परवान्याची मागणी करतो.
त्यावेळी परवाना नसल्यास दंड आकारून सोडून दिले जाते. परिवहन विभागाच्यावतीने तर कधीच परवाना तपासणी मोहीम हाती घेतली जात नाही. आता हेल्मेटसक्ती लवकरच होणार आहे. प्रत्येकाच्या डोक्यावर हेल्मेट दिसेल. परंतु त्यातील अर्ध्याधिक लोकांजवळ परवानाच नाही. डोक्यावर हेल्मेट नसले तरी परवाना नसताना वाहन चालविणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. या दुचाकी चालकांमुळे पालकही त्रस्त आहेत. परंतु पालक त्यांना सुट देत असल्याने ही तरुण असे वाहन चालवितात. (तालुका प्रतिनिधी)
धूम स्टाईल बाईकर्स
४पुसद शहरात महागड्या दुचाक्या मोठ्या प्रमाणात आल्या आहे. जोराने आवाज करत वेगाने पळणाऱ्या दुचाक्या अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकवितात. पुसद शहरात काही तरूण अशा दुचाकी भर रस्त्यावर आणि गर्दीच्यावेळी चालवित असतात. यामुळे अनेकदा अपघाताची भीती निर्माण होते. या सुसाट बाईकर्सजवळ परवाना असतो की नाही, हा ही संशोधनाचा विषय आहे. त्यांना कुणी अटकाव केल्यास राजकीय दबावही आण्यास मागेपुढे पाहात नाही.