पालकमंत्र्यांशिवाय भूमिपूजन नाही

By Admin | Updated: May 18, 2016 02:41 IST2016-05-18T02:41:51+5:302016-05-18T02:41:51+5:30

दिग्रस विधानसभा मतदारसंघात कोणत्याही विकास कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उपस्थित असल्याशिवाय होणार नाही,

Without the guardian minister, there is no Bhumi Pujan | पालकमंत्र्यांशिवाय भूमिपूजन नाही

पालकमंत्र्यांशिवाय भूमिपूजन नाही

शिवसेनेचा फतवा : अन्य पक्षातील जिल्हा परिषद सदस्यांची होतेय कोंडी
यवतमाळ : दिग्रस विधानसभा मतदारसंघात कोणत्याही विकास कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उपस्थित असल्याशिवाय होणार नाही, असा मौखिक फतवाच शिवसेनेने अधिकाऱ्यांसाठी काढला आहे. कोणत्याही लहान-मोठ्या विकास कामावर सेनेचे पदाधिकारीच कुदळ मारत असल्याने जिल्ह्यातील अन्य राजकीय पक्षांच्या जिल्हा परिषद सदस्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती सुभाष ठोकळ यांनी तीव्र नाराजी बोलून दाखविली आहे.
जलयुुक्त शिवार, पाणलोट, रोजगार हमी योजनेतील कामे, तांडावस्ती सुधार योजना, दलित वस्ती सुधार योजना, जनसुविधेची कामे, स्मशानभुमी शेड, जिल्हा परिषद फंडातील रस्ते, पाणी पुरवठ्याच्या योजना, नळयोजनांची दुरूस्ती अशा विविध स्वरूपांच्या योजनांचे भूमिपूजन पालकमंत्र्याच्या उपस्थित करावे असा असा मौखिक आदेश अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. या कामांच्या गावाची यादीच प्रसिध्द केली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या लाडखेड, बोरी, डोल्हारी, लोही सर्कलमध्ये येणाऱ्या गावांचा समावेश आहे. १६, १७ आणि १८ मे रोजी भूमिपूजन आयोजित होते. त्यामुळे या भागातील जिल्हा परिषद सदस्यांची गच्छंती करण्यासाठी पालकमंत्री अधिकार वापरत असल्याचा आरोप होत आहे. शासनाच्या नियमित योजनेतील कामांचे भूमिपूजन करण्याऐवजी निधी, प्रकल्प याची तरतूद करून मोठे भूमिपूजन करावे, असा सुर जिल्हा परिषद सदस्यांत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

रस्त्याच्या दुरुस्तीसाठीही पालकमंत्र्यांचा आग्रह कशासाठी ? - सुभाष ठोकळ
जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा बांधकाम सभापती सुभाष ठोकळ ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले,पालकमंत्र्यानी रस्ता दुरूस्तीसारख्या कामाच्या भूमिपूजनासाठी आग्रह धरावा हे आश्चर्यकारक आहे. सत्तेत असून विकास कामांसाठी अतिरिक्त निधी खेचण्याऐवजी नियोजित योजनांचे भूमिपूजन शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे. लाडखेड सर्कलमध्ये दर्यापूर येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पालकमंत्र्याचे नाव सांगून सेना पदाधिकारी पंडीत राठोड आणि सुधीर दातीर यांनी केले. हा प्रकार चुकीचा आहे. जिल्हा परिषद सदस्यांने काम आल्यानंतर कुरघोडी करणे योग्य नसल्याचेही ठोकळ म्हणाले.

Web Title: Without the guardian minister, there is no Bhumi Pujan