आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही
By Admin | Updated: August 31, 2015 02:12 IST2015-08-31T02:12:37+5:302015-08-31T02:12:37+5:30
आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये अनेक जाती शिरण्याचा प्रयत्न करीत आहे. ते आदिवसींचे आरक्षण मागत आहे.

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही
विष्णू सावरा : आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सव व प्रबोधन
यवतमाळ : आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये अनेक जाती शिरण्याचा प्रयत्न करीत आहे. ते आदिवसींचे आरक्षण मागत आहे. मात्र आदिवासींच्या ४५ जातींमध्ये कुठल्याही नवीन जातीला शिरु देणार नाही. मी असे पर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी येथे केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा, पुसद तसेच आदिवासी विद्यार्थी संघ, आयनेट बहुद्देशीय संस्था, इंडिजीनस स्टुडंट फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने येथील पोस्टल मैदानावर आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सव व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. महोत्सवाचे उद्घाटन धारणीचे आमदार प्रभूदास भिलावेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त संभाजी सरकुंडे, आदिवासी अपर आयुक्त अशोक आत्राम, आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी उल्हास सकवान, बी.जी. डाखोरे, डॉ. अरविंद कुडमेथे, संतोष पेंदाम, भाजपा जिल्हाध्यक्ष राजू डांगे, उद्धव येरमे, बाबाराव मडावी, सुरेश चिंचोळकर, किरण कुमरे, विठोबा मसराम आदी उपस्थित होते.
ना. सावरा म्हणाले, आदिवासी बांधवांमध्ये ऐक्य दिसत नाही. त्यामुळेच अनेक समाज आदिवासी समाजामध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींच्या ४५ जाती एकत्र आल्यातर कुणाचीही आदिवासींकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. आपसातील मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाची अधिक संख्या असलेल्या गावांना आपल्या गावाचा विकास करता यावा यासाठी पेसा कायद्यांतर्गत अशा गावांना निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (शहर वार्ताहर)
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनी
आदिवासी विद्यार्थी आयएएस, आयपीएस झाले पाहिजे, त्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आदिवासी विद्यार्थी काटक, कणखर आहे. त्यांना चांगले प्रशिक्षण दिल्यास खेळात ते चांगली प्रगती करू शकतात. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात येणार असल्याचे ना. सावरा यांनी सांगितले. शिक्षण विभाग खेळात नाविन्यप्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देते. याच धर्तीवर आदिवासी विभागाच्या शाळेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जाणार आहे.
शिष्यवृत्तीसाठी घोषणाबाजी
आदिवासी विकास मंत्र्यांनी आपले प्रश्न सोडवावे म्हणून कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच काही विद्यार्थी घोषणाबाजी करीत होते. यातील काही विद्यार्थी तर स्टेजवरही पोहोचले. त्यांनी शिष्यवृत्ती आणि वसतिगृहाच्या निर्मितीचा प्रश्न मंत्र्यांपुढे मांडला. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.