अभयारण्यातील प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
By Admin | Updated: April 14, 2016 02:09 IST2016-04-14T02:09:17+5:302016-04-14T02:09:17+5:30
बंदी भागातील अभयारण्यातील पाण्याचे स्रोत सध्या आटल्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

अभयारण्यातील प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
वनविभागाचे दुर्लक्ष : जंगलातील पानवठे कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांची गावांकडे धाव
महागाव : बंदी भागातील अभयारण्यातील पाण्याचे स्रोत सध्या आटल्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. वन विभागाकडूनसुद्धा या बाबत ठोस उपाययोजना झालेल्या नसल्याने प्राण्यांवर भटकंतीची वेळ आली आहे.
गेल्या काही वर्षात अभयारण्यातील लाकूड चोरीमुळे घनदाट जंगले आता विरळ झाली आहे. आरक्षित जंगल नावालाच आहे. वन विभागाकडून वन्यप्राण्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा कागदावरच आहे. त्यामुळे वन्यप्राणी जंगलाशेजारील गावांकडे कुच करीत आहे. जंगल भागातील नागरिकांनी वृक्षतोड करू नये म्हणून त्यांना जळावू लाकूड वाहून नेण्यावर बंदी घातली असतानाही लाकूड चोरी होत आहे. या परिसरातील नागरिकांना सिलिंडर व गॅस पुरविण्यात आले आहे. परंतु वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने त्यांना आजही चुलीशिवाय पर्याय नाही.
जंगलात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले पानवठे कोरडे पडले आहे. त्यामुळे हे पानवठे व त्यावर झालेला खर्च या बाबतच्या चौकशीची मागणी होत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा वन्यप्राण्यांना फिरावे लागत आहे. वानराचा कळप पाण्याच्या शोधात गावात शिरत आहे. काही जंगल भागात पाणी न मिळाल्यामुळे वानरांचा मृत्यू झाल्याचीही घटना घडल्या आहेत. वरिष्ठांनी वन्यप्राण्यांच्या या भटकंतीकडे लक्ष देऊन पानवठ्यामध्ये पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)