वणीचे जलवैभव झाले लुप्त
By Admin | Updated: September 14, 2015 02:26 IST2015-09-14T02:26:45+5:302015-09-14T02:26:45+5:30
एकेकाळी तालुक्यात जागोजागी झुळझुळणारे जलप्रवाह हे तालुक्याचे वैभव होते. तालुक्यातील जलयुक्त शिवार ही निसर्गाचीच देण होती. मात्र कालांतराने यामध्ये सतत घट होत गेली.

वणीचे जलवैभव झाले लुप्त
जलसंकट ओढवणार : उन्हाळ्यात उद्भवणार जनावरांच्या पाण्याचा प्रश्न
विनोद ताजने ल्ल वणी
एकेकाळी तालुक्यात जागोजागी झुळझुळणारे जलप्रवाह हे तालुक्याचे वैभव होते. तालुक्यातील जलयुक्त शिवार ही निसर्गाचीच देण होती. मात्र कालांतराने यामध्ये सतत घट होत गेली. आता तर वणीचे जलवैभव लुप्त झाल्याचा अनुभव घ्यावा लागत आहे. झुळझुळणाऱ्या वैभवाच्या ठिकाणी केवळ वाळूचे ढिगारे व दगडधोंडे पाहायला मिळत आहे. यावर्षी तर तालुक्यावर भीषण जलसंकट ओढवण्याची सूचक चिन्हे दिसायला लागली आहे.
तालुक्याच्या पूर्व-उत्तर-दक्षिण या तिनही सीमारेषा पैनगंगा व वर्धा या मोठ्या नद्यांनीच ठरवून दिल्या आहेत. तर निर्गुडा व विदर्भा या दोन नद्या जणू तालुक्याच्या हृदयाच्या धमण्या म्हणून बारमाही वाहत असे. १२ महिन्यांपैकी आठ महिने प्रवाहीत असणारे अनेक नाले ओढे निसर्गाने तालुक्यात दिले आहेत. यामध्ये गुंज नाला, लाल्या नाला, नांदेपेराचा नाला, चारगावचा नाला, पंचधार नाला या नाल्यांची नावे सांगता येतील. तालुक्यात लहानमोठे तलाव व मालगुजारी मातीचे तलाव हे जनावरांसाठी उपयुक्त जलसाठे उपलब्ध होते. कायरजवळ भुडकेश्वराच्या वर सैदाबादजवळ उगम पावणारे जलप्रवाह विदर्भा नदीच्या उपधमण्या समजल्या जायच्या. त्यामुळेच भुडकेश्वराच्या देवस्थानासमोर असलेल्या टाक्यात गायमुखातून सतत जलप्रवाह पडायला. असेच गयमुखातून पडणारे जलप्रवाह तालुक्यातील वरझडी, वनोजादेवी व गोडगाव येथे असणाऱ्या देवी मंदिराच्या टाक्यामध्ये सतत सुरू असायचे. त्यामुळे ही मंदिरे परिसरातील नागरिकांना पर्यटनस्थळे म्हणून आसरा वाटायची. विदर्भा नदीवर देऊरवाडा गावाजवळ असलेला धबधबा तर पर्यटकांचे आकर्षण होता. याच धबधब्याजवळ विदर्भा व पैनगंगा नदीचा संगम आहे. जिकडे-तिकडे पाणीच पाणी असल्याने पावसाळ्यामध्ये अनेक शेतात कठ्ठे फुटून धरतीतील पाणी आपोआप वर यायचे. बिना विजेने व बिना मोटारपंपाने सुरू होणारे हे प्रवाह शेतकऱ्यांच्या नजरा दिपून टाकायचे. दिवसेंदिवस हे वैभव घटत आले. चारही गायमुखी प्रवाह बंद पडले. नदी नाले अर्ध्यातच कोरडे पडू लागले. एवढेच नव्हे तर बारमाही वाहणाऱ्या निर्गुडा व विदर्भा नद्यासुद्धा उन्हाळ्यात कोरड्या पडू लागल्या. या नद्यावरील कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेच्या वास्तू म्हणून पाहायला मिळत आहे. काळाच्या ओघात ट्युबवेलद्वारे जमिनीतील पाण्याचा उपसा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे भूजल पातळी अतिखोल गेल्याने जमिनीतील नैसर्गिक झरे बंद झाले. पैनगंगा व वर्धा नदीचे प्रवाहही उन्हाळ्यात नाला-ओढ्याप्रमाणे बारीक होत असते. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे.
यावर्षी तर ५० टक्केही पाऊस पडला नाही. कोणत्याही नदी व नाल्यांना पोटभरून पुराचे पाणी गेले नाही. त्यामुळे यावर्षी येत्या २०१६ च्या प्रारंभीच नद्यांचे प्रवाह खंडीत होण्याची शक्यता नव्हे, तर ती काळ्या दगडावरची रेघ आहे. जतनेला पाणी विकत घेण्याची वेळ येणार आहे. शिवार व जंगलात पाण्याचा थेंबही मिळणार नाही. त्यामुळे खरा प्रश्न जनावरांच्या वैरण व पाण्याचा निर्माण होणार आहे. जंगली श्वापदे पाण्यासाठी गावाकडे धाव घेण्याची शक्यता बळावली आहे. तर कित्येक जनावरांना तहानेने व्याकुळ होऊन प्राण त्यागावा लागणार आहे. प्रशासनाला, वन विभागाला आता भविष्याच्या नियोजनाला लागावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता निर्गुडा नदीही फार दिवस साथ देणार नाही. तिला जीवनदान देणाऱ्या नवरगाव धरणाचेही पोट पूर्ण भरलेले नाही. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवण्याचे नियोजन यंत्रणेला हाती घ्यावे लागणार आहे.