अडणी येथे पत्नीचा भोसकून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:23 IST2018-02-10T23:22:59+5:302018-02-10T23:23:17+5:30
लगतच्या अडणी येथे घरातील बकऱ्या विकून पैसे न दिल्याने पती पत्नीत शुक्रवारी सायंकाळी वाद झाला. या वादात पतीने मुलासमोरच पत्नीला भाल्याने भोसकले.

अडणी येथे पत्नीचा भोसकून खून
लोकमत न्यूज नेटवर्क
वडकी : लगतच्या अडणी येथे घरातील बकऱ्या विकून पैसे न दिल्याने पती पत्नीत शुक्रवारी सायंकाळी वाद झाला. या वादात पतीने मुलासमोरच पत्नीला भाल्याने भोसकले. नंतर स्वत: विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पत्नीचा यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वडकी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
वसंता कोंबा कोंडेकार (४०), असे आरोपी पतीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री वसंता घरच्या बकऱ्या विकून परत आला. त्याच्याकडे पत्नी तुकाबाईने पैशाची विचारणा केली. त्यावरून दोघांत वाद पेटला. वसंताने रागाच्या भरात घरात ठेवलेला भाला पत्नीच्या पोटात भोसकला. ती रक्ताच्या थारोळ््यात कोसळली. यामुळे घाबरलेल्या वसंताने घरातच ठेवून असलेले विषप्राशन केले. दोघेही गंभीर अवस्थेत पडून होते.
हा प्रकार बघून मुलाने गावातील मोठे वडील सूर्यभान कोंडेकार यांच्या घराकडे धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने पती-पत्नीला गंभीर अवस्थेत प्रथम करंजी रुग्णालयात नेले. तेथून पाढंरकवडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही यवतमाळला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात तुकाबाईचा उपचारादरम्यान रात्रीच मृत्यू झाला, तर पती वसंताची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर यवतमाळात उपचार सुरू आहे. सूर्यभान कोंडेकर यांच्या तक्रारीवरून पतीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.