पत्नीला विहिरीत ढकलून केले ठार
By Admin | Updated: October 7, 2015 02:48 IST2015-10-07T02:48:40+5:302015-10-07T02:48:40+5:30
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला विहिरीत बुडवून ठार मारून आपल्या दोन मुलांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पत्नीला विहिरीत ढकलून केले ठार
यवतमाळ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला विहिरीत बुडवून ठार मारून आपल्या दोन मुलांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना आर्णी तालुक्यातील बारभाई शिवारातील पुरूषोत्तमनगर येथे सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणातील आरोपी पतीने शेतातच विष प्राशन केले. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
छाया विजय राठोड (३०) रा. आरंभी ता. दिग्रस असे मृत महिलेचे नाव आहे. दारव्हा तालुक्यातील चिकणी (कामठवाडा) येथील मोतीराम चव्हाण यांची मुलगी छायाचा विवाह दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील विजय चरणदास राठोड याच्या सोबत झाला होता. या दाम्पत्याला पार्थ (१०) आणि गौरी (७) अशी मुले आहेत. या दोघात नेहमीच वाद होत होते. दरम्यान रविवारी विजय आपल्या मामाचे गाव असलेल्या आर्णी तालुक्यातील सावळी येथील पुरुषोत्तमनगर येथे येथे परिवारासह गेला होता. मामाच्या शेतात पत्नी छाया व दोन मुलांसह सोमवारी दुपारी गेला. या ठिकाणी एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत वाद सुरू झाला. या वादात विजयने शेतातील विहिरीत पत्नी छायाला ढकलून दिले. त्यानंतरही छाया विहिरीतील पाईपच्या आधाराने वरचढण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावेळी निर्दयी पतीने विहिरीत उतरुन तिला पाण्यात बुडवून ठार मारले. त्यावेळी मदतीसाठी ओरडणारे मुलगा पार्थ आणि मुलगी गौरीचाही गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटका केली. यावेळी शेतात विजयची मामी आणि मामेभाऊ विकास उपस्थित होता. घटनेनंतर शेतात फवारणी सुरू असलेले औषध विजयने प्राशन केले. त्याला रुग्णालय दाखल केले.
या घटनेची तक्रार छायाचा भाऊ राजू चव्हाण याने पारवा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी विजय राठोड याच्यावर खुनाचा व जीव मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान मंगळवारी राजू चव्हाणने जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले. त्यात छायाच्या मृत्यूस पती विजय चरणदास राठोड, सासू इमला राठोड, ननद ललिता जाधव, रा. गनगाव, विजयचा मामा मोहन चव्हाण, मामे भाऊ विकास चव्हाण आणि विकासची आई सर्व रा. पुरूषोत्तम नगर, यांच्याकडून छायाचा हुंड्यासाठी छळ झाल्याचे म्हटले आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)